akola collector | Sarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांनी दत्तक घेतली "उन्नती'! 

श्रीकांत पाचकवडे 
गुरुवार, 13 एप्रिल 2017


जिल्हाधिकाऱ्यांनी उन्नतीला दत्तक घेतल्यानंतर तिच्या घरी रेडिमेड शौचालय उभारण्याची जबाबदारी "भारत एक कदम' या संस्थेचे संचालक अरविंद देठे यांनी स्वीकारली. कोणतेही शुल्क न घेता उन्नतीच्या घरी त्यांनी रेडिमेड शौचालय उभारून दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच अरविंद देठे यांनी सामाजिक बांधिलकीचा प्रत्ययाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. 

अकोला : घरची परिस्थिती हलाखीची, मात्र अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत शिकण्याची जिद्द उराशी बाळगणाऱ्या म्हैसपुर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या "उन्नती'ला अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दत्तक घेतले आहे. सावित्रीच्या या लेकीला शिकण्यासाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या पंखांना बळ दिल्याने तिच्या उज्वल शैक्षणिक भविष्याची दारे उघडी झाली आहेत. 

वऱ्हाडात अल्पावधीतच नावलौकिक मिळविणारे अकोल्याचे जी. श्रीकांत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तडकाफडकी निर्णय घेत दोषींवर कठोर कारवाईचा बडगा जी. श्रीकांत उगारत असल्याने त्यांचा झटका अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकारी जेवढे शिस्तप्रिय तेवढेच संवेदनशील मनाचे असल्याचा अनुभव अकोलेकरांना अनेकदा आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेला "मिशन
दिलासा' प्रकल्प, निराधारांसाठी माणुसकीची भिंत, स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वी अंमलबजावणी स्वतः खड्ड्यात उतरून शौचालयाचे केलेले बांधकाम अशा अनेक उपक्रमांनी त्यांच्यातील हळव्या मनाचा अधिकारी जगासमोर आला. त्यांचे हे कार्य येवढ्यावरच थांबले नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे उघडी करून देण्यासाठी "डिजिटल स्कूल' संकल्पनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यावर सुद्धा त्यांनी भर दिला आहे. 

अकोला तालुक्‍यातील म्हैसपुर जिल्हा परिषद शाळेत "डिजिटल स्कूल' च्या उद्घाटनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर इयत्ता चौथीमधील उन्नती दिलीप इंगळे या चिमुरडीने हगणदारीमुक्तीवर नाटिका सादर केली. सावित्रीबाईंच्या वेशभूषेतील उन्नतीच्या कलागुणांना पाहून प्रभावित झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिला जवळ घेत त्यांना सत्कारात
मिळालेली शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव केला. तिच्याशी आस्थेने संवाद साधल्यावर तिच्या घरीच शौचालय नसल्याचे त्यांना समजले. शौचालय नाही म्हणजेच उन्नतीची घरची परिस्थिती जेमतेम असेल, हे त्यांनी हेरले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उन्नतीचे घर गाठले व तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या गरिबांच्या झोपडीला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्यामुळे इंगळे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी उन्नतीची घरची परिस्थिती लक्षात घेता उन्नतीच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शवून तिला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख