Akhilesh yadav & Mayawati finalise seats sharing | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युती तुटली !

अखिलेश आणि मायावतींच्या युतीने भाजपला धडकी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जानेवारी 2019

.

नवी दिल्ली :  समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला आहे. हे दोन नेते उत्तर प्रदेशात एकत्र आल्याने भाजपला धडकी भरली आहे.

अखिलेश यादव यांनी दिल्ली येथे मायावती यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. या दोघांमध्ये सुमारे दोन तास बैठक चालली.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने 73 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी स्वतंत्रपणे लढले होते. हे दोन पक्ष एकत्र आल्यास 80 पैकी 50 जागा या दोन पक्षांना मिळतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

बसपा आणि सपा प्रत्येकी 37 जागा लढविणार आहेत तर सहा जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहेत. जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलासाठी तीन जागा आणि एक जागा स्थानिक पक्षासाठी सोडण्यात आलेली आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेठी आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात मात्र सपा आणि बसपा उमेदवार उभे करणार नाहीत.

कॉंग्रेस पक्षाने 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 9 जागा मिळविल्या होत्या तर 2014 मध्ये 7 जागा मिळविल्या होत्या. कॉंग्रेस पक्षाला महाआघाडीत सहभागी करून घेतले तर त्यांची जागांची अपेक्षा वाढेल म्हणून कॉंग्रेसला सध्या तरी बाहेर ठेवण्यात आले आहे.

अखिलेश आणि मायावती यांच्या आघाडीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी येत्या 15 जानेवारीला मायावतींचा वाढदिवस आहे. या दिवसाचे निमित्त साधून या महाआघाडीची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

उत्तर प्रदेशच्या 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी युती केली होती पण भाजपने सपा - काँग्रेसच्या युतीला सपाटून मार देत विजय मिळविला होता . त्यानंतर अखिलेश यांनी काँग्रेस पेक्षा मायावती यांच्या पक्षाशी युतीचे प्रयत्न चालवले होते . 

लोकसभेच्या पोट निवडणुकीत मायावतींच्या पाठिंब्यावर अखिलेश यादव यांच्या सपाचे दोन खासदार निवडून आले होते . त्यानंतर या दोन पक्षात जवळीक वाढली आहे . 

भाजपसाठी मात्र हे दोन पक्ष एकत्र येणे ही चिंतेची बाब आहे. मध्य प्रदेश , छत्तीसगढ आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकात काँग्रेसकडे सत्ता गेली आणि या तीन राज्यात भाजपच्या खासदारांची संख्या निम्म्याहून कमी होईलअशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होते . आता उत्तरप्रदेशात देखील सपा  आणि बसपा एकत्र आले तर भाजपच्या खासदारांची संख्या 73 वरून 30 वर येऊ शकते असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे . 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख