अजितदादांनी दोडकेंच्या हातात पत्र पाहताच या नेत्याकडे मागितला राजीनामा!

....
अजितदादांनी दोडकेंच्या हातात पत्र पाहताच या नेत्याकडे मागितला राजीनामा!

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील "दगाबाज' नेत्यांवर कारवाईचा आग्रह धरलेल्या नगरसेवक सचिन दोंडकेंना पाहून पक्षाचे नेते अजित पवार यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना पदाचा राजीनामा देण्याचा निरोप धाडला.

बैठकीत अजितदादांची नजर दोडकेंच्या दिशेने गेली आणि दादा म्हणाले, "अरे दिलीपला सांगा, आता राजीनामा द्यायला' ! मग, दादांच्या आदेशानंतर काही क्षणात शहराध्यक्ष चेतन तुपेंनी फोनवरून दादांचा निरोप बराटेंच्या कानावर घातला आणि नव्या नेत्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. बराटेंचा राजीनामा घेऊन विधानसभा निवडणुकीत स्वपक्षात दगाफटका केलेल्या नेत्यांना अजितदादांनी इशाराच दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजितदादांकडील दगेबाजांच्या यादीत आणखी कोणत्या नेत्यांचा समावेश आहे ? याची चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्तुळात रंगली आहे.

 विधानसभा निवडणुकीत खडकवासल्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार दोडके यांचा दोन हजार मतांनी पराभव झाला. या पराभवाला बराटे आणि माजी महापौर दत्ता धनकवडे जबाबदार असल्याचा आरोप दोडके यांचा आहे. हा निसटता पराभव जिव्हारी लागल्याने अजितदादांनी काही नेत्यांचे उट्टेही काढले आहे. या निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे लावून धरली आहे. परंतु, कारवाई झाली नसल्याची तक्रार करीत दोडके, नारायण लोणकर, नितीन कदम, नीलेश निकम या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना शुक्रवारी पुन्हा पत्र दिले. "पक्षविरोधी कारवाई केलेल्यांवर कारवाई झालीच पाहिजे,' अशी मागणीही पत्रात केली आहे. 

त्याआधी विधान भवनातील बैठकीला अजितदादा येणार असल्याने दोंडके आणि कदमही पोचले. तेव्हाच या दोघांच्या हातात तक्रारीच्या पत्राची प्रतही होती. पत्र देण्याआधीच दोंडकेंना पाहून अजितदादांनी थेट बराटेंना राजीनाम्याचा निरोप पाठविला. त्यानंतर नव्या नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू करून, इच्छुकांचे अर्जही मागविण्याची सूचना तुपे यांनी केली आहे. एकूणच स्वपक्षातील गटातटाचे राजकारण संपवून पक्षविरोधी कारवाई केलेल्यांना सरळ करण्याची मोहीम अजितदादांनी उचलल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com