दादा म्हणाले होते, "सब से बडा गद्दार!"

....
दादा म्हणाले होते, "सब से बडा गद्दार!"

पुणे : वर्ष २०१७. पुणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले हे त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांना पुन्हा संधी मिळावी, यासाठी खटपटत होते. अखेर राष्ट्रवादीशी पंगा घेऊन रेश्मा भोसले यांना भाजपच्या मदतीने रिंगणात उतरविले. त्या नगरसेविका झाल्या. तेथून अजित पवार आणि भोसले यांच्यात जे वैर आले ते आलेच.

अनिल भोसले म्हणजे अजितदादा पवार यांचे एकदम निष्ठावान कार्यकर्ते. (जसे माजी आमदार बापू पठारे हे देखील होते) म्हणूनच राष्ट्रवादीने भोसले विधान परिषदेवर दोनदा पाठविले होते. पण त्यांच्याच पत्नीचे तिकिट महापालिकेला कापले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ते बैचेन झाले होते. काही म्हणतात की निर्णय कोणताही घ्या पण मला आधी विश्वासात घ्या, एवढीच त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात अजित पवारांनी थेट तिकिट कापल्याने ते चिडले होते.  त्यांनी या निवडणुकीत रेश्मा भोसले यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. भाजपच्या पाठिंब्यावर त्या महापालिकेत गेल्या. भोसलेंनी बंड केल्याने चिडलेल्या दादांनी "अनिल भोसले म्हणजे 'सगळ्यात मोठा गद्दार आहे'' अशी जळजळीत टीका केली होती. 

रेश्मा भोसले यांना महापौरपद मिळेल, अशी भोसले यांना अपेक्षा होती. पण भाजपने मुक्ता टिळक यांना ही संधी दिली. पुढेही 
रेश्मा भोसले यांना भाजपकडून विशेष काही मिळाले नाही. दुसरीकडे अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे आमदार असल्याने त्यांना 
भाजपमध्येही महत्व राहिले नाही. भाजपमध्ये प्रवेश केला तर आमदारकी गमवावी लागणार, त्यामुळे ते तसेही करू शकत नव्हते.

राष्ट्रवादीने त्यांनी बेदखल केले होते. शिवाजीनगर बॅंकेचे प्रकरण निघाल्यानंतर अनिल भोसले पुण्याच्या राजकारणातून हद्दपार  झाले. गेले काही महिने ते सायलेंट मोडवर आहेत. त्यांचे कट्टर कार्यकर्ते दुरावले. भोसलेंनी मधल्या काळात राष्ट्रवादीशी पुन्हा सलगी करण्याचा प्रयत्न केला पण; त्यांना नेत्यांनी भाव दिला नाही.  शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी भाजप सत्तेत असतानाच चौकशी सुरू झाली. पहिली कारवाई वारजेच्या शाखेवर झाली. कालांतराने संचालकांवर गुन्हा दाखल झाला.

राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास या संकटातून सुटका होईल, अशी भोसलेंना अपेक्षा होती. भोसले यांचे भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांचे हे व्याही. या काकडे यांचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे व्याही. हा नातेसंंबध पाहिल्यानंतर भाजप राज्यात सत्तेवर येणे हे भोसलेंसाटी महत्त्वाचे होते.  पण नाट्यमय पद्धतीने सत्तांतर झाल्यानंतर भोसले यांची धाकधूक वाढली आणि अखेर मंगळवारी रात्री (ता. 25 फेब्रुवारी) अनिल भोसले यांच्यासह चौघांना पुणे पोलिसांनी अटक  झाली.  कुटुंबात एक नगरसेवक पद पदरात पाडून घेण्यासाठी केलेली उठाठेव भोसले यांना महागात पडली. 

राष्ट्रवादीत असताना पक्षाने भोसले यांना भरभरून दिले होते. त्यांचा सभागृह नेतेपदाचा कालावधी म्हणजे राष्ट्रवादीचा पुण्यातला सुवर्णकाळच होता. त्याकाळी भोसले अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभाजी बागेत महारक्तदान शिबीर आयोजित करत. त्याला सलमान खान, माधुरी दिक्षित असले सेलिब्रिटी यायचे. रक्तदान करणाऱ्याला पेन ड्राईव्ह वाटले होते. तेव्हा पेन ड्राईव्ह म्हणजे फार महत्वाची व मोठी गोष्ट होती. 

पुण्यात राष्ट्रवादी भवन उभारण्याचे स्वप्न भोसले यांनीच दादांना दाखविले होते. ते काही उभारले नाही, पण त्या निमित्ताने भरपूर फायदे मिळाले. पण २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा निर्णय चुकला. त्यानंतर भोसले यांचे ग्रहही  बदलले. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सर्वसामान्य नागरिकांनी पैसे ठेवले.  कर्जवाटप करताना घोळ झाला आणि त्यात भोसले व सहकारी अडकले. 
राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस महत्वाचा भागीदार आहे, गृहमंत्री राष्ट्रवादीचा आहे, दादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शब्दाला महत्व  आहे. तरीही भोसले यांना अटक झाली. त्यामुळे अजितदादांच्या त्या `सबसे बडा गद्दार` या वाक्याची पुन्हा आठवण झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com