अजित सूर्यवंशीवरील ट्रॅप पुण्यात फसला, पण सांगलीत यशस्वी झाला!  - ajit surywanshi trapped by acb | Politics Marathi News - Sarkarnama

अजित सूर्यवंशीवरील ट्रॅप पुण्यात फसला, पण सांगलीत यशस्वी झाला! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

बालगृहाची बोगसगिरीही यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. 

सांगली : पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांच्या बालगृहाची बोगस नोंदणी दाखवून अनुदान लाटणाऱ्या संस्था चालकाला सरकारी अधिकाऱ्यास दोन लाखांची लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. अजित उद्धव सूर्यवंशी (रा. पारे, ता. खानापूर, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. 

सांगली व कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईने प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे.

अजित सूर्यवंशी हा पारे येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृह संस्थेचा अध्यक्ष आहे. संस्थेत रेकॉर्डवर 88 मुलांची नोंदणी आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी संस्थेची तपासणी केली त्यावेळी बालगृहात 7 मुले आढळली. सूर्यवंशी याने मुलांची खोटी नोंदणी दाखवून सरकारचे अनुदान लाटले. तसेच चालू वर्षी मंजुर झालेले अनुदान मागणीसाठी खोटी कागदपत्रे व 88 मुले हजर असल्याची माहीती त्याने दिल्याचे तपासाणीत निष्पन्न झाले. सूर्यवंशी याच्या बोगसगिरीची माहिती सुवर्णा पवार ह्या त्यांच्या वरिष्ठांना देणार असल्याची माहिती सूर्यवंशीला मिळाली. त्यामुळे 5 डिसेंबरला सूर्यवंशी याने पवार यांच्याशी मोबाइलवर बोलताना सातत्याने नकारात्मक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवू नये, यासाठी लाच देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर पवार यांनी तातडीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांना लेखी तक्रार दिली. त्यानुसार आज 1 लाख 98 हजार रुपये लाच देताना सूर्यवंशी याला पथकाने रंगेहात पकडले. 

पहिलीच घटना
"लाचलुचपत'च्या कारवाईत आजवर लाच घेणारा सरकारी अधिकारी जाळ्यात सापडला आहे. परंतू या घटनेमुळे सक्षम महिला अधिकाऱ्यामुळे पहिल्यांदाच लाच देणारा जाळ्यात सापडला. सूर्यवंशी यांच्या जिल्ह्यात विविध 19 शाळा आहेत. त्याच्या बालगृहाची बोगसगिरीही यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. 

पुण्यातील प्लॅन फसला 
अधिकारी सुवर्णा पवार यांना सूर्यवंशी हा वारंवार फोन करत होता. त्यानी पुण्यात दिलेल्या तक्रारीनंतर 11 डिसेंबरला पुणे स्टेशनजवल सूर्यवंशी हा पवार यांना भेटणार होता. त्यानुसार हॉटेल सागर येथे सूर्यवंशीला पकडण्यासाठी जाळे लावले होते. परंतु सुवर्णा पवार यांना सांगलीतील प्रशासकीय कामानिमित्त पुन्हा सांगलीत यावे लागले. त्यामुळे सूर्यवंशी हा विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आला. त्यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख