अजितदादा म्हणाले, काम जरा चांगलं करा की राव... पैसे घेताय आपण !

मतदारसंघातील एवढे महत्वाचे काम सुरु असताना पालकमंत्र्यांचे कामाकडे लक्ष दिसत नाही. ते करतात तरी काय? भाविकांची गैरसोय होतेय हे त्यांना दिसत नाही का?-अजितपवार
Ajitdada-&-contractor
Ajitdada-&-contractor

सिद्धटेक:  "काम जरा चांगलं करा की राव... पैसे घेताय आपण... ह्याची जाडी किती... पाण्यावाचून ते पांढरं फटक पडलंय... जरा पाणी मारीत जा... ते काही लांबून आणायचंय का... काम चांगलं झालं तर ठीक... नाहीतर सगळ्या कामांची चौकशी लावीन... जरा गुणवत्तेचं काम करा... तसं नाही केलं तर ब्लॅकलिस्टला टाकायला भाग पाडू...", हे उदगार  आहेत, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आणि स्थळ आहे येथील भीमा नदीवरील पूरग्रस्त पूल...!

पूलावरील वाहतूक बंद असल्याने खासगी दौऱ्यानिमित्त येथे आलेले अजित पवार येथील पूलावरुन शुक्रवारी पायी चालत होते. पूलाच्या कामाला आणखी कालावधी लागणार असल्याची माहिती दिल्यानंतर ते पूलावरच थांबले. यावेळी त्यांचा पाराच चढला. ठेकेदाराला बोलावून घेतले.

 ठेकेदाराचा नातेवाईक समोर येताच ते म्हणाले की," सध्या श्रावण महिना सुरु आहे, सलग सुट्यांमुळे भाविकांची गर्दी होत आहे. आता पुढे गणेशोत्सव असल्यामुळे भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांना हे काम डे-नाईट करायला सांगितले आहे. पूलावरील थराची जाडीसुद्धा तुम्ही कमीच ठेवलीय. तसेच तुमच्या कामाबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत, कामात गुणवत्ता ठेवा, नाहीतर ब्लॅकलिस्टला टाकायला लावू."  त्यानंतर पुण्याचे अधिक्षक अभियंता सदाशिव साळुंके यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

विशेष म्हणजे पूलावरील महत्वाचे काम सुरु असताना येथे देखरेखीला कोणीही बांधकाम विभागाचा अधिकारी उपस्थित नव्हता. तयार झालेल्या थरावर पाणी न मारल्यामुळे ते पांढरे पडले होते. कामाच्या देखरेखीची जबाबदारी मैल कामगारावर सोपवून अधिकारी निर्धास्त होते. त्याबाबतही अजितदादांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मतदारसंघातील एवढे महत्वाचे काम सुरु असताना पालकमंत्र्यांचे कामाकडे लक्ष दिसत नाही. ते करतात तरी काय? भाविकांची गैरसोय होतेय हे त्यांना दिसत नाही का?असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

येथील सिद्धटेक-राशीन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्यांनी विचारणा केली असता, ठेकेदाराचा नातेवाईक म्हणाला की, आम्हाला त्यावेळी डांबर उपलब्ध होऊ शकले नाही. 

त्यावर अजितदादांनी उद्विग्न होऊन म्हणाले," अरे काय कारणं सांगताय, मग कामंच थांबवायचं होतं, आता पुन्हा त्याला पैसा लागणार नाही का ? " असा प्रतिप्रश्न केल्यावर सर्वच जण निरुत्तर झाले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com