अजित पवारांची सत्ता गेली की `माळेगाव` जाणार...मंत्री झाले की परत येणार!

....
ajit pawar malegaon
ajit pawar malegaon

सोमेश्वरनगर : राज्याच्या सत्तेतून अजित पवार जेव्हा जेव्हा बाहेर राहिले तेव्हा तेव्हा माळेगाव कारखाना त्यांच्या हातातून निसटला. मात्र पवार पुन्हा राज्याच्या सत्तेत येताच 'माळेगाव'ची सूत्रेही सभासदांनी पुन्हा अजित पवारांच्या हातात दिली आहे. कालच्या माळेगावच्या निकालाने 2002 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात 1997 साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या विरोधात चंद्रराव तावरे यांनी शड्डू ठोकला आणि जोरदार लढत देत माळेगावची सत्ता काबीज केली होती. मात्र, 2001 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने सत्तापरीवर्तन केले. त्यानंतर आत्मविश्वास प्राप्त केलेल्या राष्ट्रवादीने 2002 च्या पंचवार्षिक निवडणुकीत चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचा पराभव करत माळेगाव कारखान्याची सत्ता पुन्हा काबीज केली. त्याच घटनेची पुनरावृत्ती आता पुन्हा झाल्याचे बोलले जात आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेतून प्रचंड वेगाने बाहेर फेकला गेला. त्यानंतर झालेल्या माळेगाव कारखान्याच्या 2015 च्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार यांनी आपली ताकद लावली होती. परंतु चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरूशिष्याच्या जोडीने राष्ट्रवादीच्या पॅनेलचा भाजपाच्या मदतीने पराभव करत राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन दिग्गजांच्या गावांत झालेल्या पराभवाने राष्ट्रवादी घायाळ झाली होती. यानंतर बारामतीतल्याच सोमेश्वर कारखान्यावरही अजित पवारांच्या पॅनेलविरोधात काकडे गटाने जोरदार लढत दिली होती. मात्र पराभवातून शिकलेल्या अजित पवार यांनी निवडणूक खांद्यावर घेऊन यश संपादन केले होते. आता मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष असूनही सत्तेबाहेर फेकला गेला आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आली. तेव्हापासून राष्ट्रवादीचे माळेगावच्या सत्तेचे स्वप्न अधिक गडद होत गेले. निवडणुकीच्या शेवटच्या चार दिवसात अजित पवार यांनी प्रचाराची सगळी सूत्रे हातात घेत आणि माळेगाव कार्यक्षेत्रासह सोमेश्वर, छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातील सगळी कुमक कामाला लावली. आणि अखेर एकवीसपैकी सोळा जागा प्राप्त करत विजयश्री खेचून आणली. गुरूशिष्याने यावेळीही घाम गाळायला लावला असला तरी ते सत्तेपासून मात्र दूर झाले आहेत. त्यामुळे राज्याची सत्ता आली की माळेगावमध्येही सत्तापरीवर्तन होते ही म्हण पुन्हा अधोरेखीत झाली आहे. परीणामी माळेगावला राज्याची मदत मिळणे अधिक सुकर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com