अजित पवारांनी `माळेगाव` जिंकला; पण चंद्रराव तावरेंवरचा डाव हुकलाच!

...
अजित पवारांनी `माळेगाव` जिंकला; पण चंद्रराव तावरेंवरचा डाव हुकलाच!

माळेगाव, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) : राज्याचे लक्षवेधी ठरलेल्या बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारली आणि सत्तापरिवर्तन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत यश खेचून आणले.

ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, सुरेश खलाटे, तानाजी कोकरे, संगीता कोकरे हे विद्यमान संचालक पुन्हा निवडून आले. विशेषतः पवार यांनी मावळते सत्ताधारी चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांना शह देत माळेगावचा गड जिंकला.

माळेगावच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.२४) ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता. २५) दुपारी संपली. २१ जागांपैकी १७ जागांवर विजय मिळवित राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलने यश संपादन केले, तर ४ जागा जिंकत चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून कडवी जुंज दिली.

तब्बल २८ तास अखंडपणे सदरची मतमोजणी प्रक्रियाला सुरू राहिल्याने ही निवडणूक दोन्ही बाजूने किती प्रतिष्ठेची होती, हे स्पष्ट होते. सांगवी या गटामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने पुन्हा मतमोजणी घेण्यात आली होती. उमेदवार रणजित खलाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे अनिल तावरे यांच्या मतांमध्ये एक अंकी फरक होता. त्यामुळे तावरे यांच्या मागणीनुसार घेतलेल्या फेर मतमोजणीत त्यांचा २० मतांनी विजयी झाला. अर्थात हा अनपेक्षित धक्का सहकार बचाव पॅनेलला मानला जातो.

दरम्यान, अर्थसंकल्पी अधिवेशनामुळे अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतानाही अजित पवार यांनी वेळ देत माळेगावसाठी फिल्डींग लावली होती. नवीन चेहऱ्यांबरोबर मावळते सत्ताधारी तावरे यांच्या माजी बंडखोर संचालकांना बरोबर घेत अजित पवार यांनी चंद्रराव व रंजन तावरे यांना सत्तेपासून दूर ठेवले. तसेच कार्यक्षेत्रात चार सभा घेत पवार यांनी सांगवी गटाच्या बालेकिल्ल्यात चंद्रराव तावरे यांना खिंडार पाडण्यासाठी उद्योजक नितीन जगताप यांच्या माध्यमातून पक्षाची चौथी उमेदवारी दिली होती. जगताप यांनी पक्षाचे प्रामाणिक काम केले, परंतु त्यांना स्वतः निवडून येता आले नाही.

......

माळेगावचे गटनिहाय विजयी उमेदवार (कंसात पक्ष व मिळालेली मते)- ब वर्ग  - स्वप्नील जगताप (७७, राष्ट्रवादी),

माळेगाव - रंजन तावरे (६४११ - सहकार बचाव), बाळासाहेब तावरे (६१८४ - राष्ट्रवादी), संजय काटे ( ५७४४ - राष्ट्रवादी).

पणदरे गट - तानाजी कोकरे (६१७७), केशवराव जगताप (६१७५) व योगेश जगताप ( ५७२२ - तिघेही राष्ट्रवादी).

सांगवी गट - चंद्रराव तावरे (६४६८ - सहकार बचाव), अनिल तावरे (५८४४) सुरेश खलाटे (६०१८ - दोघे राष्ट्रवादी).

नीरावागज गट - मदनराव देवकाते (५९१७), बन्सीलाल आटोळे ( ५९१० - राष्ट्रवादी), प्रताप आटोळे ( ५७३० - सहकार बचाव).

बारामती गट - नितीन सातव (५९२०) व राजेंद्र ढवाण ( ५८७७ - राष्ट्रवादी), गुलाबराब गावडे ( ५९१८ सहकार बचाव).

महिला प्रतिनिधी - अलका पोंदकुले (५७५०) व संगीता कोकरे ( ६०१५ - राष्ट्रवादी).

एनटी प्रतिनिधी - तानाजी देवकाते (६७७२ - राष्ट्रवादी), अनुसूचित जाती व जमाती - दत्तात्रेय लक्ष्मण भोसले (६१८३ - राष्ट्रवादी).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com