अजित पवारांच्या अडचणी वाढल्या !

अजित पवारांसह आनंदराव अडसूळ आदींसह 76 बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचा लाभार्थी म्हणून मूळ तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
Ajit_pawar in crisis
Ajit_pawar in crisis

मुंबई :  महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . त्यांच्याविरुद्ध सिंचन घोटाळ्यातही चौकशी सुरु आहे . विधानसभेच्या निवडणुका तोंडावर  आलेल्या असताना सोमवारी  दाखल झालेल्या गुन्ह्याने अजितदादांना एकाच वेळी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे . 

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी  गुन्हा दाखल केला. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. नेते व अधिकारी मिळून 300हून अधिक व्यक्तींविरोधात ही तक्रार देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसच्या 76 नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अजित पवारांसह आनंदराव अडसूळ आदींसह 76 बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचा लाभार्थी म्हणून मूळ तक्रारीत उल्लेख करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. राजकीय नेत्यांनी नियमाचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल होऊनही गुन्हे न दाखल केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, शिखर बॅंकेच्या 46 संचालकांसह 34 जिल्हा बॅंकांच्या संचालकांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था-व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बॅंक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बॅंकेला भाग पडले. या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती.

 याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिन्यात अरोरा यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, त्यानंतर कोणतीच कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला जाब विचारला होता. तेव्हा अरोरा यांच्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आला नाही, असे उत्तर आर्थिक गुन्हे शाखेने दिले होते.

त्यानंतर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकादारांची विनंती मान्य करत पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471, 120(ब) सह लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 13(1) अ व 13(1) क अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चौकशी?
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे तत्कालीन संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे तत्कालीन संचालक, जिल्हा सहकारी बॅंकेचे तत्कालीन संचालक, तत्कालीन उपमुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री व इतर लोकसेवक यांचा संशयित म्हणून उल्लेख गुन्ह्यात करण्यात आला आहे. नेते व अधिकाऱ्यांशी संबंधित सहकार खाते व 'नाबार्ड'च्या अहवालाचाही समावेश तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व नेत्यांना आर्थिक गुन्हे शाखा चौकशीला बोलवण्याची शक्‍यता आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com