बारामतीच्या नगरसेवकांना अजितदादांनी झाप झाप झापले! घरी बसविण्याची तंबी

मी स्वताः कडक असलो तरी अधिका-यांकडून काम करुन घेण्याची एक हातोटी असते, तुम्ही त्यांच्याकडून समजूतीने वागून काम करुन घ्यायला हवे, अधिका-यांशी अडेलतट्टूपणे वागाल तर ते मी खपवून घेणार नाही असे नगरसेवकांना अजित पवारांनी सुनावले.
बारामतीच्या नगरसेवकांना अजितदादांनी झाप झाप झापले! घरी बसविण्याची तंबी

बारामती शहर :  `बारामतीच्या नागरिकांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे बघून मते दिली आहे. गट- तट कराल तर राजीनामे घेऊन नवीन नगरसेवक निवडून आणण्याची धमक माझ्यात आहे, त्यानंतर अजित पवार राजकारणात आहे तो पर्यंत तुम्हाला एक पदही मिळू देणार नाही, अशा शब्दांत आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फैलावर घेतले.

शरद पवारसाहेब सांगतील तेच फक्त अजित पवार ऐकेल. कोणीही सोम्या म्या मला काही सांगायला लागला तर ते खपवून घेतले जाणार नाही असा सणसणीत इशाराच आज त्यांनी दिला.

तालुक्यातील सरपंच उपसरपंच सत्कार सोहळ्यात बोलताना आज अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, अधिका-यांशी घरगडी असल्याप्रमाणे काही नगरसेवक वागतात अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तुम्ही अडेलतट्टूपणाने अधिका-यांशी का वागता? तुमच्या वागण्याने अधिकारी रजेवर निघून जातात असे सुनावत मला असले वागणे आवडणार नाही, हे मी तुम्हाला जाहिरपणे समजून सांगतो आहे. नुसते इतकेच नाही तर काही पुरुष नगरसेवक महिला नगरसेवकांशीही व्यवस्थित बोलत नाहीत, अशाही तक्रारी आल्या आहेत, मी हे खपवून घेणार नाही.

अजितदादा एवढ्यावरच थांबले नाहीत. जर कोणी गट तट करण्याच्या भानगडीत पडला किंवा वीस नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन आणून माझ्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला तर सह्या करणा-या सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेऊन त्यांच्या जागी नवीन नगरसेवक निवडून आणण्याची धमक माझ्यात आहे हे विसरु नका, नाय वीस नगरसेवक निवडून आणले तर पवारांची औलाद नाही सांगणार, असा सणसणीत इशारा त्यांनी दिला.

 
गणेश मंडईच्या गाळे वाटपातही काही जणांनी गडबड केल्याचे माझ्या कानावर आले आहे, पवारसाहेबांसमोर या मंडईतील व्यावसायिकांना त्यांच्या पूर्वीच्या जागा मिळतील अशा शब्द दिलेला आहे, नगरसेवकांनी वाटपात चूक केली असेल तर ती चूक माझ्याकडून दुरुस्त केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शब्द पाळतो म्हणून बारामतीच्या राजकारणात मी टिकून आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्याच्या बाहेरही कोणी नगरसेवकांनी जायचे नाही हेही त्यांनी नगरसेवकांना सुनावले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com