तब्बल वीस वर्षांनंतर अजित पवार आज कट्टर विरोधकांच्या गावात! बारामतीच्या राजकारणाला वळण

तब्बल वीस वर्षांनंतर अजित पवार आज कट्टर विरोधकांच्या गावात! बारामतीच्या राजकारणाला वळण

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील राजकारण आज वेगळे वळण घेणार आहे. गेली 50 वर्षे सुरू असलेल्या राजकीय संघर्षाची आज सांगता होण्याची शक्यता आहे. हा राजकीय संघर्ष छोटा किंवा छोट्या नेत्यांचा नव्हता. पवार विरुद्ध काकडे अशा राजकीय लढाईची ही अखेर असणार आहे.

त्याला निमित्तही तसेच आहे. निंबुत (ता. बारामती) येथे आज (ता. 16) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी साडेचार वाजता सुमारे अडीच कोटी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने आहेत. यानिमित्ताने सुमारे वीस वर्षांनंतर पवार हे काकडे गटाच्या बालेकिल्ल्यात कार्यक्रमासाठी येत आहेत. या कार्यक्रमात अजित पवार व त्यांचे सतीश काकडे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बारामतीत पवार विरूध्द काकडे हा उभा दावा 1967 पासून बघायला मिळतो. शरद पवार यांना पहिल्यांदा काॅंग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला होता. त्याचे पडसाद सातत्याने उमटत गेले. स्थानिक पातळीवर या दोन कुटुंबातील लढाई चर्चेची राहिली होती.

मागील तीस- पस्तीस वर्ष काकडे गटाचे प्रमुख व शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक अशा विविध निवडणुकांमध्ये थेट अजित पवार यांच्याविरोधात लढाई केली होती. 1992 ला अजित पवार यांनी काकडे गटाकडून सोमेश्वर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर वादात भरच पडली होती. सोबतचे एकेक कार्यकर्ते अजित पवारांकडे गेले तरी. सोमेश्वरचे माजी अध्यक्ष स्व. बाबालाल काकडे यांनी कट्टर विरोधकाची भूमिका बजावली. सतीश काकडे हे त्यांचे समर्थ वारसदार म्हणून पुढे आले. परंतु 2002 ची कारखाना निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर 2007 व 2014 च्या निवडणुकांमध्ये मात्र वाकयुद्ध जोरदार रंगले होते. 2012 ची जिल्हा परिषद गटातील निवडणूक काकडे यांनी जिंकली.

नुकत्याच डिसेंबर 2016 मधे झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका मात्र याला अपवाद ठरल्या. राष्ट्रवादीकडून चुलत बंधू प्रमोद काकडे उभे राहिल्यावर सतीश काकडे यांनी शांत राहिले. नीरा बाजार समीतीची निवडणूक बिनविरोध करण्यातही त्यांनी मदत केली. यानंतर पवार यांच्याशी सतीश काकडे यांची जवळीक वाढली. तत्पूर्वी पवार यांनी ग्रामसचिवालय, तीर्थक्षेत्राचा दर्जा व अन्य अनेक विकासकामे निंबुतला दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना दत्तात्रेय भरणे, प्रदीप कंद यांनीही काकडे यांना विकासात मदत केली. वंदना चव्हाण, प्रमोद काकडे या राष्ट्रवादीच्या मंडळीसह अन्य पक्षीय लोकांकडूनही काकडे यांनी निधी आणला आहे. अजित पवार हे आज अडीच कोटींच्या कामांची उद्घाटने करणार आहेत. त्यांच्या मातोश्री आशा पवार व पत्नी सुनेत्रा पवार याही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पवार- काकडे उभा दावा मिटणार अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी व शेतकरी कृती समिती या दोन्ही गटांचे उद्याच्या सभेकडे लक्ष लागले आहे.


याबाबत सतीश काकडे यांनी, विरोधात असुनही अजितदादांनी आम्हाला कोट्यवधी रुपयांची कामे दिली. गावातील भैरवनाथ तीर्थक्षेत्राला `क` दर्जा मिळवून दिला. त्यामुळे आमचे निमंत्रित करणे कर्तव्य आहे. विकासाच्या बाबतीत राजकारण आणायचे कारण नाही अशी प्रतिक्रिया दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com