Ajit Pawar is trying to gain sympathy : Subhash Deshmukh | Sarkarnama

अजित पवारांना जनतेची सहानुभूती मिळवायचीय : सुभाष देशमुख

संदीप काळे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सोलापूरमधील विधानसभेची काय तयारी सुरु आहे, भाजपाची रणनीती काय आहे, याबाबत सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करत संदीप काळे यांनी घेतलेली प्रश्नोत्तर स्वरूपातील विशेष मुलाखत

 

विधानसभेसाठी भाजपची रणनीती काय? कुठल्या मुद्द्यांवर मते मागणार?

सोलापूरमधील विधानसभेची काय तयारी सुरु आहे, भाजपाची रणनीती काय आहे, याबाबत सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करत संदीप काळे यांनी घेतलेली प्रश्नोत्तर स्वरूपातील विशेष मुलाखत

 

विधानसभेसाठी भाजपची रणनीती काय? कुठल्या मुद्द्यांवर मते मागणार?

२०१४ साली नरेंद्र मोदी यांना जनतेने पंतप्रधानपदी विश्वासाने निवडून दिले. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे, हे राज्य ज्या वेगाने पुढे जात आहे ते पाहत विकास या मुद्द्याला न्याय देणे, गरिबांना घरे देणे, गॅस देणे, गरीब माणसाला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र आणि देश समृद्ध करण्यापासून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. विकासाचा मुद्दा तसेच देश आणि राज्य समृद्ध करण्याचा मुद्दा येत्या निवडणुकीत महत्त्वाचा आहे.

 

 ईडी चौकशीच्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता?

२००५ ते २०११ पर्यंत बँकेमध्ये जी अनियमितता आली, त्यामुळे बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाला. २०११ नंतर सर्व अहवाल बघून त्यावेळी नाबार्ड, रिझर्व्ह बँकने निर्बंध आणून प्रशासक नेमला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. त्यावेळेपासून जी चौकशी सुरु होती, ती आजपर्यंत सुरु होती. त्यावर कोर्टाने सुनावणी करून त्याचा जो निकाल आहे, तो आता दिला आहे. हा योगायोग आहे की, इथे निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली, आणि तिकडे हायकोर्टाने यावर गुन्हे दाखल करण्याचा सूचना दिल्या. वास्तविक यामध्ये केंद्र किंवा राज्य शासनाचा काहीच संबंध नाही. हे घोटाळे पूर्वीचेच आहेत. त्यामुळे कावळा बसायला आणि फांदी तुटायला हीच वेळ आली.

 

ईडीची चौकशी भाजपाची खेळी आहे, अजित पवारांच्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे?

मला असं वाटतं अजित पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे हे सर्व काही सरकार करतंय की कोर्ट करतंय हे त्यांना माहीत असावं. निवडणूक आणि लोकशाहीमध्ये काहीही बोललं तरी चालतंय, तशातला हा प्रकार आहे. लोकांची सहानुभूती त्यांना घ्यायची आहे. मला असं वाटते राज्यातील जनतेने सर्व काही ओळखलं आहे, काय खरं काय खोटं हे पुढील काळात स्पष्ट होईल.

 

 

 

राजकारणात अनेकांना टोपण नावं आहेत, "बापू" या नावामागचं रहस्य काय?

कुटुंबामध्ये मोठ्या व्यक्तीला नावाने बोलण्यापेक्षा अण्णा, दादा, काका बोलत असतात. माझ्या कुटुंबात माझ्यापेक्षा लहान बहिणीने मला बापू म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ते बाहेर पसरत गेले, आणि व्यवसायात असताना कुटुंबातील जे म्हणतात त्याच नावाने बाहेरचे हाक मारतात. ते आता प्रचलित झालं आहे. या नावामागे काही उद्देदेश किंवा ठरवून केल्यासारखं काहीच नाही.

तुमचं खातं सांभाळतांना गेल्या पाच वर्षांतील अनुभव कसा होता?

सहकार क्षेत्र, पणन आणि वस्त्रोद्योग आणि नव्याने आलेलं पुनर्वसन आणि मदत करणे हे खातं माझ्याकडे आलं आहे. मी माझ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्त्रोद्योगमधील धोरण आणलेलं आहे. त्यामध्ये वीज दरामध्ये सवलत असेल, व्याजदरात सवलत असेल, असे अनेक प्रकार केलेले आहेत. सहकार क्षेत्रातसुद्धा जवळपास ४८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा या खात्यातून घेण्यात आले. सहकार क्षेत्र मोडीत काढण्यात यावे यासाठी आज अनेक आरोप होत आहेत. पतसंस्थांसाठी सुरक्षा योजना या सरकारच्या काळात करण्यात आलेल्या आहेत. ठेवीदारांचे संरक्षण याच सरकारने केले आहे. माझा दावा आहे, या ४ वर्षांमध्ये जवळपास २ हजार संस्था नव्याने काढल्या आहेत. बंद पडलेल्या जवळपास साडेचार हजार संस्था मार्गी लावल्या आहेत. 

 

मला असं वाटतं पणनच्या विषयातसुद्धा शेतकऱ्यांना आजपर्यंत बाजारसमितीमध्ये मतदानाचा अधिकार मिळाला आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयात निर्यातीच्या बाबतीत देखील सरकारला विनंती करून नियंत्रण ठेवण्यात आले. सगळ्यात मोठं म्हणजे पंतप्रधान जे बोलतात की, सरकारचे उत्पन्न कमी झाले पाहिजे आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळाला पाहिजे. तो प्रयोग माझ्या काळात यशस्वी झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी काम करण्यासाठी मोकळेपणा दिल्याने हे सर्व काम करून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.

 

ईडीच्या चौकशीत शरद पवारांचे नाव आलंय, त्याकडे तुम्ही कसं पाहता?

मला असं वाटतं की, या चौकशीत नाव का आलं? कसं आलं? हे त्या चौकशीअंती त्या चौकशी अधिकाऱ्याला माहिती असते. तो ड्राफ्ट मी वाचून पाहिलेला नाही. ऐकून मिळालेली माहिती वेगळी असते आणि बोललेलं वेगळं असते. त्यामुळे आपण स्वतः वाचल्याशिवाय त्यावर भाष्य करणं उचित नाही. चौकशीअंती काही समोर आलं असेल पण त्यांची काही चूक नसेल तर काही शिक्षा होण्याचं किंवा दोषारोप ठेवण्याचं काही कारण नाही. चौकशीअंती ते नक्की सिद्ध होईल.

 

या प्रकरणाचा भाजपच्या मतपेटीवर काही परिणाम होईल का?

भाजपच्या डोक्यात हे अजिबात नाही. सामान्य माणूस, शेतकरी, तरुण, यांना केंद्रस्थानी मानून विकास करणे, हाच अजेंडा भारतीय जनता पक्षाचा आहे.

 

निवडणुका खूप महाग झाल्या आहेत, याला कोण जबाबदार आहे?

महागाई जशी वाढते तसे हे खर्च वाढत असतात. यासाठी अनेक व्यवस्था जबाबदार असतात, निवडणूक एकटी याला जबाबदार नाही. ही व्यवस्था जशी घडते त्यानुसार काम करत राहावे लागते.

भाजपमध्ये अनेकजण येत आहेत, त्यामुळे जुन्या लोकांवर अन्याय होत आहे का?

मला असं वाटत माझ्याकडे मदत आणि पुनर्वसन विभाग असल्यामुळे या सर्व जुन्या लोकांना मदत केली जाईल, त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील.

 

बापूंना लोकांनी मतदान का करायचे?

हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा मतदारसंघात जाऊन विचारा..विकास हाच माझा अजेंडा आहे.

 

सरकारने कोणती कामे केली आहेत?

तुम्ही दक्षिण तालुक्यात जाऊन जनतेला विचारा, जनता नक्की उत्तर देईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख