ajit pawar target bjp | Sarkarnama

आमदारांचे निलंबन हा लोकशाहीचा खून : अजित पवार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 मार्च 2017
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन सदस्यांची दोन दिवसांची कार्यशाळा महाबळेश्‍वरला घ्यावी, अशी सूचना करून अजित पवार म्हणाले, या कार्यशाळेत कामकाज कसे करावे, पाठपुरावा कसा करावा, लाभार्थ्यांना लाभ कसा देता येतो, स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी काय करावे, याचा ऊहापोह यामध्ये व्हावा. तसेच आमदारांनीही सदस्यांसाठी वेळ द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
.
सातारा : अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटना विरोधी असून हा लोकशाहीचा खून आहे. कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. दरम्यान, पक्ष पद देऊ शकते तसेच चुकीचे काम केल्यास पद मागेही घेऊ शकते, हे सर्वांनी जाणून जमिनीवर पाय ठेवून काम करा, असा सल्ला नवीन सदस्यांना त्यांनी दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील नूतन सदस्यांचा सत्कार प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, शेखर गोरे, प्रभाकर घार्गे, राजाभाऊ उंडाळकर, सुनील माने, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

चव्हाण साहेबांनंतर शरद पवारांवर जिल्ह्याने प्रेम केले. सातारा व पुणे या दोनच जिल्ह्यांनी राष्ट्रवादीला बहुमत दिले. पुणे जिल्ह्याला जे जमले नाही ते सातारा जिल्ह्याने सर्व पंचायत समितीत सभापती आणून करून दाखविले, असे सांगून अजित पवार म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत जे झाले ते पुन्हा घडु नये. सध्या केंद्रात व राज्यात आपले सरकार नाही. त्यामुळे संजीवराजेंवर सर्व सदस्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेची सत्ता चालविण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. अध्यक्षपदाची एकच जागा व इच्छुक अनेक असल्याने सर्वानुमते संजीवराजेंची निवड केली. मानसिंगराव यामध्ये कुठे कमी पडले असे नाही. आता विषय समितीच्या निवडीत सर्व आमदारांची गुढीपाडव्या दिवशी मुंबईत बैठक घेऊन तेथे निर्णय घेतला जाईल. त्यासाठी सर्व आमदारांनी वेळ काढावा, अशी सूचना त्यांनी केली. पाच वर्षात 12 सदस्यांना संधी देता येईल. त्यादृष्टीने जबाबदारी ठरवू. मागील वेळी सर्व सदस्यांचे राजीनामा घेतले पण काहींनी राजीनामे दिले नाहीत. परिणामी बरेच राजकारण घडले. जिल्हा परिषदेच्या सत्तेला गालबोट लागले. आताच्या पदाधिकाऱ्यांत संजीवराजे खूपच संयमी व कारभार सक्षमपणे हाताळणारे आहेत. पण वसंतराव मानकुमरे थोडेसे आक्रमक आहेत. पण त्यांचा आक्रमकपण कुठे दाखवायचे ते त्यांनी लक्षात ठेवावे, असा सल्ला त्यांनी मानकुमरेंना दिला. पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला जाऊन बसू नका. वाढदिवसाच्या तर कार्यक्रमांना जाताना सावध रहा. पक्षाला व जिल्हा परिषदेच्या सत्तेला कमी पणा येणारे कृत्य तुमच्या हातून होऊ नये, याची काळजी घ्या. कारण सोशल मीडिया फार सतर्क आहे हे लक्षात घ्यावे.

आता विधानसभेची निवडणूक गुजरात सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. सरकार अल्पमतात आले तर राजीनामा द्यावा लागले म्हणून विरोधी आमदारांचे निलंबन केले. सरकार हा रडीचा डाव खेळत असून लोकशाहीचा हा खून असून महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीच घडले नाही. सरकारचा नियोजन शून्य कारभार सुरू असून सरकार वाचवायचे इतकेच काम सुरू आहे. हे सर्व लक्षात घेऊन आगामी विधान सभेची निवडणूक लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व पंचायत समितींचे सभापती व उपसभापती यांनी पारदर्शक कारभार करून लोकांचा विश्‍वास संपादन करावा, अशी सूचना त्यांनी केली. पक्ष पद देऊ शकतो, त्याप्रमाणे चुकीचे काम केल्यास ते पद काढूनही घेऊ शकतो. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांनी पारदर्शक काम करा. पद मिळाले म्हणून हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवून काम करा, असा सल्ला ही त्यांनी दिला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख