ajit pawar request malegaon voters with folded hand | Sarkarnama

अजित पवार चक्क हात जोडून म्हणाले, `या वेळी ती चूक करू नका!`

कल्याण पाचंगणे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अजित पवारांसाठी नेहमीच महत्त्वाची असते. या वेळी विरोधकांची सत्ता घालविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 

माळेगाव : मी उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री व जिल्हा बॅंकेपासून सर्वकाही विकास प्रक्रिया राबविणारी यंत्रणा आपल्याबरोबर असल्यामुळे माळेगाव कारखान्याची प्रगती आणि विक्रमी ऊस दर देण्यात आम्ही कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही माळेगाव कारखान्याच्या सभासदांना अजित पवार यांनी आज दिली.

हा कारखाना राज्यात पवारसाहेबांचा म्हणून ओळखला जातो. साहेबांना शोभेल असा विजय निलकंठेश्वर पॅनेलचा करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार केले. राष्ट्रवादीचेच परंतु आपल्या मांडीलामांडी लावून भरणाऱ्यांनी जर या निवडणूकीत गंमतजंमत केली, तर त्यांना खूपच महागात पडेल, असाही इशारा पवारांनी यावेळी दिला. 

माळेगाव कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचार्थ आज बारामतीत राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. छत्रपती कारखान्याचा विरोधकांनी प्रचाराचा मुद्दा केल्याचा धागा पकडत पवार म्हणाले,``सोमेश्वर कारखाना अर्थिकदृष्ट्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी मी माझी आमदारकी पणाला लावली. तेथील सभासदांना ३३०० रुपये असा सर्वाधिक ऊस दर देण्याचा प्रयत्न यशस्वी केला. परंतु छत्रपतीमध्ये समाधानकारक काम झाले नाही, हेही मी मान्य करतो. परंतु इंदापूर व नीरा-भिमा कारखान्यांसह इतरांचा विचार केल्यास काहीसी छत्रपतीची अवस्था बरी आहे. यापुढे छत्रपतीची स्थिती चांगली दिसेल यासाठीही प्रयत्न होतील.``

माळेगाव कारखान्यात सर्वकाही अलबेल आहे, असे नाही. एकाजणाच्या हट्टीपणामुळे दोनशे कोटींच्या फसलेल्या विस्तारीकणामुळे तोटा वाढलाय. पूर्ण क्षमतेने न चालणारे डिस्टलरी व वीज प्रकल्प, साखरेचा दर्जाबरोबर सरासरी टनेजही घसरत चालल्याने नविन यंत्रसामु्ग्रीत मोठ्या दुरुस्त्या कराव्या लागतील. निलकंठेश्वर पॅनेल निवडून आल्यानंतर या दुरुस्त्या करण्यासाठी व्हीएसआय संस्था, सहकार विभागाची पहिली महत्वपूर्ण बैठक घेतली जाईल. सत्ताधाऱ्यांनी कारखान्याच्या उत्पन्नातून नव्हे, तर गेटकेन शेतकर्यांच्या पोटाला चिमटा घेवून सभासदांना ऊस दर दिला. त्यापैकी एखाद्यी जरी तक्रार झाल्यास गेटकेनधारकांना पैसे कोठून देणार,`` असा सवाल पवारांनी केला.

संचालकांच्या २१ जागा आणि इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने नाराज मंडळी विरोधकांना मदत करतात, त्याबाबत पवारांनी संबंधितांना तशी चूक करू नका अशी चक्क हात जोडून विनंती केली. शिवाय स्वीकृतची एक व नव्याने निर्माण होणाऱ्या सहाव्या खांडज गटातील तीन जागा आणि शिवनगर शिक्षण संस्थेतील ट्रस्टींच्या ६ जागांवरती सर्वाधिक मतदान केलेल्या गावांना संधी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

माळेगाव कारखान्याच्या सत्तेतील वाटा सर्व घटकांना देण्याचा विचार पवारसाहेबांसह माझा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण हे अद्याप घोषित केले नाही. निलकंठेश्वर पॅनेल निवडणूक आल्यानंतर पवारसाहेबांच्या विचाराने वरील विषय हातळला जाईल. सिंगल वोटींग घेणाऱ्या उमेदवाराचा मात्र लागलीच राजिनामा घेणार आहे. तसेच सभासदांनीही पॅनेल टू पॅनेल मतदान करा अन्यथा मत नाही दिले तरी चालेल, असेही नम्रपणे सांगण्यास अजित पवार विसरले नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख