माझा आणि अजित पवारांचा फोन झालाच नाही...

ajit pawar not called me
ajit pawar not called me

पुणे : अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्याऐवजी नव्या कार्यकर्त्याला पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत स्थान मिळावे, यासाठी मी प्रयत्न केला. नव्या कार्यकर्त्यांना संधी नाही मिळाली तर पक्ष कसा वाढेल, असा सवाल करत अंकिता पाटील यांची संधी नाकारण्यासाठी आपला आणि अजित पवारांचा फोन झाल्याची चर्चा ही खोटी असल्याचे काॅंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेत काल राजकीय नाट्य रंगले. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेत काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हिला स्थायी समितीत स्थान मिळू शकले नाही.

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आपले समर्थक दत्ता झुरुंगे यांच्या नावाचे पत्र जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे दिले होते. त्यावर मात करत हर्षवर्धन यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पत्र आणले व काॅंग्रेसतर्फे त्याच स्थायी समितीवर जातील, असे सांगितले. मात्र तडजोड न झाल्याने ही निवडणूकच पुढे ढकलण्यात आली. झुरुंगे यांच्यासाठी काॅंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोलावे, असे जगताप यांनी त्यांना सुचविले होते. मात्र पाटील यांच्याशी थोपटे यांचा संवाद झाला की नाही, हे जगताप सांगू शकले नाहीत. एकाच घरात पदे देण्याऐवजी इतरांना संधी दिली तर त्याचा पक्षाला फायदा होईल, यासाठीच झुरुंगेचे नाव सुचविल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

या साऱ्या प्रकारात राष्ट्रवादीने हर्षवर्धन यांची कोंडी केल्याचे चित्र तयार झाले. त्यासाठी अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हालचाली केल्याची चर्चा होती.

या संदर्भात जगताप म्हणाले की माझे या विषयावर राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याचे बोलणे झालेले नाही. अजित पवारांशी तर नाहीच नाही. मी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याशी झुरुंगे यांना संधी देण्याबद्दल बोललो होतो. आमच्या पुरंदर तालुक्याला जिल्हा नियोजन समिती किंवा स्थायी समितीत संधी मिळाली नाही. ती मिऴावी, एवढाच माझा हेतू होता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकारावर काॅंग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात जो निर्णय़ देतील, तो मला मान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com