अजित पवारांच्या डावपेचांना धक्का : हवे असलेले ते चार संचालक अपात्र

ajit pawar and malegaon election
ajit pawar and malegaon election

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकी प्रकऱणात अपात्रतेची कारवाई झालेल्या चार संचालकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली व तत्कालिन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा निर्णय कायम ठेवला.

न्यायालयाच्या आदेशामुळे अपात्र ठरलेले माजी संचालक रामदास आटोळे, राजेंद्र बुरुंगले, सौ. उज्वला कोकरे, बाळासाहेब गवारे या पदाधिकाऱ्यांना सहकार कायद्याच्या नियमानुसार सह वर्ष निवडणूक बंदीचा दणका बसला. कारखान्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई झाल्याची माहिती पुढे आली आहे.

या संचालकांच्या आधारे माळेगावच्या निवडणुकीत डावपेच आखण्याचे अजित पवार यांनी ठरविले होते. मात्र त्यांच्या या प्रयत्नाला उच्च न्यायालयाच्या निकालामुळे खीळ बसली आहे. 

माळेगाव कारखान्याची उचललेली बिनव्याजी अनामत रक्कम सहकार कायद्याने ठरवून दिलेल्या वेळेत न भरल्याने रामदास आटोळे, राजेंद्र बुरुंगले, सौ. उज्वला कोकरे, बाळासाहेब गवारे यांच्याविरुद्ध सन २०१६ च्या दरम्यान तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार आयुक्त यांनी अपात्रतेची कारवाई केली होती.

या कारवाईच्याविरुद्ध वरील पदाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार बुधवार (ता. २२) रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद उच्च न्यायलयाने ऐकून घेतला व आज (गुरूवारी) त्यांनी सहकारमंत्र्यांच्या निकाल कायम ठेवत याचिकाकर्त्यांचा अर्ज फेटाळून लावला. अपात्र श्री. आटोळे व श्री. बुरुंगले यांच्याविरुद्ध सभासद शिवाजी निवृत्त पोंदकुले यांनी, तर श्री.गवारे व सौ. पोंदकुले यांच्याविरुद्ध कै. रामभाऊ टेकावडे यांनी सन २०१६ मध्ये सहकार आयुक्तांकडे तक्रार दिली होती. आटोळे यांनी ४ एप्रिल २०१६ रोजी कारखान्यातून दोन लाख रुपये, तर १८ मे २०१६ रोजी दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये घेतले होते. त्याचपद्धतीने संचालक श्री. बुरुंगले यांनीही २६ एप्रिल २०१६ रोजी घेतलेले दोन लाख रुपये ठरवून दिलेल्या मुदतीत परत केले नाहीत. तशीच काहीशी स्थिती गवारे व कोकरे यांची थकबाकीबाबत झाली होती. कारखान्याची घेतलेली रक्कम ३० दिवसांच्या आत परत न केल्याचे तक्रारकर्त्यांनी सहकार खात्याच्या निदर्शनास आणून दिले होते.

माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्या शेतकरी पॅनेलमधून श्री. आटोळे, श्री.बुरुंगले, सौ.कोकरे हे पदाधिकारी गेल्या निवडणुकीत निवडून आले होते, तर श्री. गवारे हे राष्ट्रवादी पुरूस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलमधून विजयी झाले होते. सन २०१६ मध्ये माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्या सत्ताधारी संचालक मंडळात कारभारातील या ना त्या कारणास्तव दुफळी माजली होती. त्यावेळी अध्यक्ष श्री. तावरे यांचे सह्यांचे अधिकार काढण्यासाठी संबंधित बंडखोर व अपात्र संचालकांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संचालकांच्या मदतीने सहकार आय़ुक्त कार्य़ालय़ाकडे मागणी केली होती. परिणामी अध्यक्ष तावरे यांच्यापुढे कारभार करताना पेच निर्माण झाला होता. बंडखोर संचालकांनी राष्ट्रवादीच्या सोबतीने तयार केलेला संचालकांचा कोरम मोडण्यासाठी अध्यक्ष तावरे यांनी वरील अपात्रतेच्या कारवाईची खेळी खेळली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com