अजितदादांची ही स्टाईल माजी आमदार पठारेंची आठवण करून देणारी...

अचानक भाजपवासी झाल्याने अजितदादा झाले ट्रोल!
अजितदादांची ही स्टाईल माजी आमदार पठारेंची आठवण करून देणारी...

पुणे : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार हे शपथविधीच्या आदल्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी रात्री विरोधी महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते; तर हेच अजितदादा शनिवारी सकाळी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताता दिसल्याने संपूर्ण राजकीय क्षेत्र आवाक झाले.

तेव्हा, अजित पवारांची ही "स्टाइल' पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांच्यासारखी असल्याची चर्चा रंगली आहे. वडगावशेरीत रात्री रात्री साडेनऊपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरलेले पठारे पुढच्या काही तासांत फडणविसांना भेटून "भाजपवासी' झाल्याचे दिसले होते. त्यावरून अजितदादा आणि पठारे यांच्या राजकीय निष्ठा चर्चेच्या ठरल्या आहेत. 

भाजपविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला एकत्र आणून राज्यात पर्यायी सरकार आणण्यासाठी शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनीही पुढाकार घेतला होता. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्‍यता ओढवताच "कोण माय का लाल आमदार फुटतोयते ते बघू' अशा शब्दांत अजित पवारांनी राष्ट्रवादीसह नव्या मित्र पक्षांच्या आमदारांना चांगलाच दम भरला होता. मात्र हेच अजितदादा आपल्या पक्षातील काही आमदारांना फोडून शनिवारी उपमुख्यमंत्री झाले.

राजकारणात काहीही होऊ शकते , या चर्चांनी शनिवारी लोकांची करमणूकही झाली. भाजपसोबत गेल्याने अजितदादा "ट्रोल'ही झाले आहेत. पण हे नाट्य एका रात्री तेही काही तासांत कसे काय घडले ? यावरही गमतीशीर विनोद होत आहेत. त्यामुळे अजितदादा आणि पठारेंच्या राजकीय "स्टाइल' जुळाल्याची बोलले जात आहे. 
विधानसभा निवडणुकीत वडगावशेरीतून राष्ट्रवादीने नगरसेवक सुनील टिगंरेंना उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी अजितदादांसमवेत पठारे एके दिवशी दुपारपर्यंत टिंगरेंच्या प्रचारात होते. अजित पवारांसोबत त्यांनी रॅलीत फोटोही काढले.

पण त्याच संध्याकाळी अचानक पठार भाजपचे तेव्हाचे आमदार जगदीश मुळीक यांच्या गाडीतून मुख्यमंत्री फडणविसांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर तास-दीड तासाच गळ्यात भाजपचे उपरणे घातलेले पठारे मुख्यमंत्र्यांशेजारी उभे राहून फोटोसेशन करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले. या निवडणुकीत पठारेंनी साथ देऊनही विद्यमान आमदार मुळीक पराभूत झाले, तर राष्ट्रवादीचे टिंगरे विजयी झाले. टिंगरे हे अजितदादांचे समर्थक मानले जातात. मात्र आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com