ajit pawar explane new concept | Sarkarnama

"लंडन आय'च्या धर्तीवर सी-लिंक येथे "मुंबई आय' - अजित पवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावी यासाठी राज्य सरकार मुंबईच्या सौंदर्यात वाढ व्हावी यासाठी लंडनमधील "लंडन - आय'च्या धर्तीवर मुंबईतही "मुंबई - आय' उभारण्यात येणार आहे. मुंबई आयमधून पर्यटकांना संपूर्ण मुंबईचे दृष्य 700 मीटरपेक्षा अधिक उंचीवरून "जायंट व्हील'वरून पाहता येईल.

मुंबई : एका दृष्टिक्षेपात मुंबईचे विशाल रूप डोळ्यांत साठवून घेता यावे यासाठी वांद्रे-वरळी सी-लिंक येथे "मुंबई आय' उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. "लंडन आय'च्या धर्तीवर हे महाकाय निरीक्षण चक्र साकारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी "मुंबई आय' उभारण्याची संकल्पना मांडली होती. हा प्रकल्प महापालिका उभारेल, असेही त्यांनी सांगितले होते. ही संकल्पना आता प्रत्यक्षात येण्याची शक्‍यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रकल्पासाठी "सीआरझेड'चा अडसर येत आहे; मात्र "मुंबई आय' साकार झाल्यास नागरिक आणि पर्यटकांसाठीही एक मुख्य आकर्षण ठरेल. 

मुंबई पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावी यासाठी राज्य सरकार मुंबईच्या सौंदर्यात वाढ व्हावी यासाठी लंडनमधील "लंडन - आय'च्या धर्तीवर मुंबईतही "मुंबई - आय' उभारण्यात येणार आहे. मुंबई आयमधून पर्यटकांना संपूर्ण मुंबईचे दृष्य 700 मीटरपेक्षा अधिक उंचीवरून "जायंट व्हील'वरून पाहता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन विभागाच्या या प्रस्तावावर चर्चा झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यासाठी वांद्रे वरळी सी लिंकजवळ बांद्य्राच्या दिशेला टोल नाक्‍याच्या शेजारी असलेल्या जागेवर मुंबई आय उभारण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सीआरझेड, हवाई वाहतूक मंत्रालय अशांच्या परवानग्यांची आवश्‍यकता असणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील 20 वर्षांपूर्वी ते पर्यटन मंत्री असतानाही अशा प्रकारचे "जायंट व्हील वॉच' मुंबईत उभारले जावे यासाठी प्रयत्न केल्याची माहिती "सकाळ'ला सांगितले. मात्र हा प्रस्ताव त्यावेळी पुढे केला नाही. परंतु मुंबईसाठी अशा प्रकारच्या जायंट व्हील वॉचची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्‍त केले. मुंबई महानगरपालिकेने देखील वांद्रे बॅण्ड स्टॅण्डजवळील 14 हजार स्केअर मीटर जागेवर मुंबई आय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार मुंबई आयची उंची 630 मीटर इतकी असणार होती. हा जगभरातील सर्वात उंच पाळणा ठरला असता. मात्र, पुरेशा निधीअभावी त्यावेळी हा प्रस्ताव बारगळला. 

लंडन आय कसे आहे 
"लंडन आय' मोठ्या आकाश पाळण्यासारखे आहे. थेम्स नदीच्या काठावर 'लंडन आय' उभारण्यात आले असून जगभरातील पर्यटकांमध्ये याचे आर्कषण आहे. उंचावर जावून लंडनचे विहंगम दृष्य पाहता येते. आकाश पाळण्यातून संथ गतीने लंडन पाहण्याची गंमत निराळीच आहे. 'लंडन आय'ची उंची ही 135 मीटर आहे, दरवर्षी 'लंडन आय'ला जवळपास 35 लाख पर्यटक भेट देतात. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख