शरद पवारांच्या बदनामीमुळे उद्वीग्न होऊन राजीनामा दिला : अजित पवार

''राज्य सहकारी बँकेबाबत २०११ मध्ये तक्रार दाखल झाली होती. पण इतके वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावरच शरद पवार व माझे नांव यायला लागले. या प्रकरणाशी किंवा बँकेशी शरद पवार यांचा दूरान्वयेही संबंध नाही. तरीही या प्रकरणाशी नांव जोडून पवार यांची बदनामी सुरु केली गेल्याने मी उद्वीग्न होऊन कुणालाही न सांगता आमदारकीचा राजीनामा दिला," असा खुलासा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत केला.
अजित पवार
अजित पवार

मुंबई : ''राज्य सहकारी बँकेबाबत २०११ मध्ये तक्रार दाखल झाली होती. पण इतके वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावरच शरद पवार व माझे नांव यायला लागले. या प्रकरणाशी किंवा बँकेशी शरद पवार यांचा दूरान्वयेही संबंध नाही. तरीही या प्रकरणाशी नांव जोडून पवार यांची बदनामी सुरु केली गेल्याने मी उद्वीग्न होऊन कुणालाही न सांगता आमदारकीचा राजीनामा दिला," असा खुलासा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत केला. 

अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अन्य वरिष्ठ नेते, कार्यकर्ते यांना काहीही सांगितले नव्हते. त्यानंतर अजित पवार यांनी आपला फोनही बंद ठेवला होता. आज सकाळी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली व त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याबाबत खुलासा केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, डाॅ. जितेंद्र आव्हाड आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, "शिखर बँकेच्या कामकाजाशी शरद पवार यांच्याशी कुठलाही संबंध नाही. छत्रपती किंवा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद या नात्याने हा संबंध जोडता येऊ शकतो. मात्र, राज्य सहकारी बँकेच्या कामकाजाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. पण तरीही गेले काही दिवस शरद पवार व माझे नांव घेऊन सतत बदनामी सुरु होती. ईडीच्या प्रसिद्धीपत्रकातही शरद पवार यांचे नाव होते. त्यातून मी अस्वस्थ झालो होतो.'' २८५ कोटी रुपये नफा मिळवूनही २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असल्याबद्दल अजित पवार यानी आश्चर्य व्यक्त केले. 

''मी एरव्ही कुटुंबप्रमुख या नात्याने पवार साहेबांना सगळे सांगतो. मात्र, या प्रकरणात मी उद्वीग्न झालो होतो. गेले तीन दिवस माझ्या मनात राजीनाम्याचा विचार येत होता. मला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनीही राजीनाम्याचे कारण विचारले. पण नंतर सांगतो म्हणून मी त्यांच्या कार्यालयातून निघून गेलो. मी काल मुंबईतच होतो. एका नातेवाईकाच्या घरी मी गेलो होतो. फोन बंद केला होता.'' असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार यांचे नांव ईडी प्रकरणात आल्यानंतर अजित पवार हे पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानाकडे फिरकले नाहीत, अशा बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबत खुलासा देताना अजित पवार म्हणाले, "बारामती व परिसरात पूर आला होता. तिथल्या पूरस्थितीत मदत करण्यासाठी मी बारामतीत होतो. तिथून निघायला रात्र झाली. म्हणून मी दुसऱ्या दिवशी पुण्याहून मुंबईकडे निघालो. पण टोल नाक्यावरच्या प्रचंड रांगात मी अडकलो. त्यामुळे मी 'सिल्व्हर ओक'ला वेळेत पोहोचू शकलो नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com