Ajit Pawar critisizes Shiv sena and state government | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

'धरले तर चावते अन सोडले तर पळते 'अशी शिवसेनेची अवस्था - अजित पवार 

संग्राम जगताप : सरकारनामा न्यूज ब्युरो 
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

संपामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे अतोनात हाल होताहेत . दुप्पट चौपट भाडे आकारून आज प्रवाशांची लूट होते आहे . सरकारने तुटेपर्यंत ताणू नये .  

बारामती :" महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेची अवस्था धरले तर चावते अन सोडले तर पळते या म्हणीप्रमाणे झाली आहे . त्यांना सत्ता सोडवत नाही आणि सरकारपासून दुरावत चाललेला मतदार धरून ठेवावा वाटतो " , असा टोला राष्ट्रवादी काँगेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला  लगावला . 

बारामती येथी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी दिवाळी आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही असे सांगत राज्य सरकार आणि शिवसेनेवर हल्ला चढवला . ते म्हणाले , "शिवसेनेला मंत्रिपदाची आणि सत्तेची उब सोडवत नाही . मात्र मतदार राज्य सरकारवर विविध कारणांनी नाराज झाला की यांना आंदोलने सुचतात. "

" लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून दाखवतात बघा आम्ही  आंदोलन करतोय . तुमचा डबल गेम चाललाय , हे न कळायला  महाराष्ट्रातील लोक काही इतके खुळे  नाहीत . त्यांना सर्व कळते .  तुम्ही सरकारमध्ये आहात तर लोकोपयोगी धोरणे शासनाने राबवावीत म्हणून आग्रह धरा .

"भाजपवाले तुमचे ऐकत नसतील तर मंत्रिमंडळातून आणि सत्तेतून बाहेर पडा , मग तुम्हाला आंदोलन करण्याचा हक्क आहे . तुम्ही सरकार आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही भूमिका कशा करू शकता ? शिवसेनेचे हे वागणे दुतोंडी गांडुळासारखे आहे . "

एसटीचा संप तुटेपर्यंत ताणू नका 
"राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा चा संप तुटेपर्यंत ताणू नये . आज सरकारच्या धोरणामुळेच महागाई वाढली आहे . आधी नोटबंदी , मग जीएसटीने नागरिक व्यापारी हैराण आहेत . त्यातच जगात सर्वात महाग पेट्रोल डिझेल महाराष्टर विकले जात आहे . त्यामुळे महागाई भडकली आहे . एसटीच्या कर्मचाऱयांना पगार पुरत नाही . म्हणूनच यांनी दिवाळी असताना आंदोलनं केले आहे . "

"संपामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे अतोनात हाल होताहेत . दुप्पट चौपट भाडे आकारून आज प्रवाशांची लूट होते आहे . सरकारने तुटेपर्यंत ताणू नये .  दोघांनीही दोन पावले मागे यावे . प्राध्यापकांना सरकारने सातव्या वेतन आयोगाची भरघोस वाढ दिली हे चांगलेच आहे . अशी वाढ आता एसटी कर्मचाऱ्यांनाही द्या . "असेही अजित पवार म्हणाले . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख