शिक्षक, प्राध्यपक चोर तर संस्थाचालक दरोडेखोर : तावडेंचे मत असल्याचा अजितदादांचा गौप्यस्फोट

शिक्षक, प्राध्यपक चोर तर संस्थाचालक दरोडेखोर : तावडेंचे मत असल्याचा अजितदादांचा गौप्यस्फोट

सोमेश्वरनगर : शिक्षक, प्राध्यापक चोर आहेत आणि संस्थाचालक दरोडेखोर आहेत' असे विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे अनेकदा खासगीत माझ्याकडे व्यक्त करतात, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. एखादा संस्थाचालक तसा असेलही परंतु सगळ्यांनाच मोजपट्टी लावू नये. चुकणारांवर कारवाई करा पण चांगलं करणारांना मदत करा. तावडे यांच्या धोरणांमुळे लाखो शैक्षणिक पदे रिक्त आहेत. सगळीकडून कोंडी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या 'माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृह' या बहुउद्देशीय इमारतीचा पायाभरणी समारंभ पवार यांच्या हस्ते आज संपन्न झाला. आठ हजार स्क्वेअर फूट आकाराच्या व एक हजार विद्यार्थी क्षमतेच्या या इमारतीसाठी माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे यांनी सव्वा कोटीचा भार उचलला आहे. याप्रसंगी पार पडलेल्या सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी पणन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शामकाका काकडे होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सतीश खोमणे, संजय भोसले, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, लालासाहेब माळशिकारे, नंदा सकुंडे, जितेंद्र सकुंडे उपस्थित होते.

तुम्ही सांगाल त्या आरक्षणाचा, मेरीटचा माणूस घेऊ. पण हे तयार नाहीत. यामुळे जिल्हा परिषद शाळा, शिक्षणसंस्थांमध्ये जागा रिक्त असल्याने शैक्षणिक पाया चांगला राहिला नाही तर भावी पिढ्या माफ करणार नाहीत. सिंहगडसारख्या नावाजलेल्या महाविद्यालयाची कोंडी झालीय. मागास, वंचित घटकातील मुलांचे काही पैसे महाविद्यालयाला सामाजिक न्याय विभागाकडून येतात. काकडे महाविद्यालयाचे, चाळीस लाख, विद्या प्रतिष्ठानचे कोटीच्या पुढे, रयतचे काहीशे कोटी रूपये सरकारकडे बाकी आहेत. महाविद्यालये चालवायची कशी म्हणून सिंहगडचे संस्थापक जेलमध्ये गेले. हे शिष्यवृत्त्यांचे पैसेही देत नाहीत आणि प्रवेश दिला नाही की कारवाई करतात, अशी टीका पवार यांनी केली.

'हे' लोक इतर वेळी रामाला वनवासात पाठवितात पण निवडणूक आली की रामाला घेऊन येतात, अशी टीका पवार यांनी भाजप-शिवसेनेवर केली. तसेच, समृध्दी एक्स्प्रेस पूर्ण व्हायला चार-पाच वर्ष आहेत तोवरच नावावरून ते भांडत बसलेत. असाच 'ह्यांनी' पुणे-मुंबई एक्स्प्रेस सुरू केला आणि उर्वरीत काम आम्ही पूर्ण केलं आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असं नाव देऊन टाकलं. समृध्दी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार तुम्ही बसा भांडत, अशी मिश्कीलीही त्यांनी केली.

आर. एन. शिंदे यांच्या दातृत्वाचे कौतुक करत त्यांना बारामतीकरांच्या वतीने 'सलाम' केला. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॅा. सोमप्रसाद केंजळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com