अजित पवारही म्हणतात ``.तर मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही..``

...
ajit pawar
ajit pawar

माळेगाव :"माळेगाव कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी नीलकंठेश्‍वर पॅनल विजयी करा, मी तुमते भाग्य उजळून टाकतो,'' अशी हाक देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना "पॅनल टू पॅनल' मतदान करण्याचे आवाहन केले. माळेगाव (ता. बारामती) येथे "राष्ट्रवादी'पुरस्कृत नीलकंठेश्‍वर पॅनेलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ""नीरा डावा कालव्याचे पाणी आपल्या सरकारमुळे समन्याय पद्धतीने पुन्हा बारामती, इंदापूरसाठी वळविताना यश आले. हे सरकार शेतकऱ्यांचे असल्यामुळेच हा मोठा निर्णय झाला. भाजपची सत्ताधारी मंडळी त्यांचे सरकार असताना वरील प्रश्नांवर तोंड उचकटत नव्हती. या कारखान्यातील रिकव्हरी लॉसमुळे झालेले प्रतिटन 300 रुपयांचे नुकसान लोकप्रतिनिधी या नात्याने मला सहन होत नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पवारसाहेबांनी आयुष्यभर काम केले. प्रामुख्याने साखर उद्योग व दुग्धव्यवयास वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.``

माळेगावच्या शेतकऱ्यांनाही अधिकचे दोन पैसे मिळविण्यासाठी त्या वेळी साखरनिर्मितीबरोबर डिस्टलरी, वीजनिर्मिती आदी प्रकल्प उभारण्यासाठी साहेबांनी सहकार्य केले; परंतु चंद्ररावअण्णा व रंजन तावरे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे या कारखान्याचे वाटोळे झाले. शेतकरी अडचणीत सापडला. सोमेश्वर कारखाना, जिल्हा बॅंक, बारामती दूध संघ, मार्केट कमिटी आदी अग्रगण्य सहकारी संस्था "राष्ट्रवादी'चे पदाधिकारी उत्तम पद्धतीने चालवतात. तुम्ही मात्र सहकाराच्या नावाखाली हुकूमशाही पद्धतीने सहकारी तत्त्वे अक्षरशः पायदळी तुडवून कारभार केला. विस्तारीकरणाचा प्रकल्प अहवाल दडवला, शेतकऱ्यांच्या पोरांना सभासद करून घेतले नाही, नोकरभरतीमध्येही त्यांच्यावर अन्याय केला. शिक्षण संस्थेचा बोजवारा उडाला आहे. तेथील कारभारात सहकारी लोकांना डावलणे, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला असता, आपल्या सहकारी संचालकांनाच घरी घावविले, असा घाणेरडा कारभार करत सहकार मातीत घालण्याचे काम या मंडळींनी केले, तरीही आम्हालाच म्हणताय, सहकाराचे विरोधक. वारे...वा अण्णा कोणाला बनवायला निघालायंय,''असा आरोप त्यांनी केला.

""रिकव्हरी, वीजनिर्मितीचा उच्चांक केलेल्या "सोमेश्वर'शी सहकारी तर सोडाच; पण खासगी कारखानेसुद्धा स्पर्धा करू शकत नाहीत. अर्थात, अशीच स्थिती माळेगावची करून दाखविण्याची धमक नीलकंठेश्‍वर पॅनेलच्या उमेदवारांमध्ये आहे. सभासद बांधवानो, सरकार आपले आहे. पवारसाहेबांच्या विचारांचे संचालक मंडळ निवडून द्या, तुमचे भाग्य उजळून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,'' असा शब्द पवारांनी उपस्थितांना दिला.

बाळासाहेब तावरे यांनी माळेगावचा पाच वर्षांतील कारभार चुकीचा झाल्याचे सांगितले. या वेळी "सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.

अजित पवार यांचे आवाहन
"माळेगाव हा साहेबांचा घरचा कारखाना आहे, या कारखान्याच्या निवडणुकीत तसाच विश्वास टाकत सभासदांनी "कपबशी' या चिन्हावर शिक्का मारून साहेबांच्या विचारांचे संचालक मंडळ भरघोस मतांनी निवडून आणावे. मी आपले ऋण कदापि विसरणार नाही,' असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com