Ajit Pawar answers question about Parth Pawar | Sarkarnama

पार्थ फिरला म्हणून काय झाले ? : अजित पवार

संजय मिस्कीन 
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी मनसेने देखील महाआघाडीत एकत्र आले पाहिजे.

-अजित पवार

मुंबई :  "  पार्थ पवार फिरायला लागला म्हणून काय झाले ? ," असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला . 

पार्थ पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत  विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना  अजित पवार म्हणाले ,"आजकाल मुलं त्यांचा स्वत:चा निर्णय घेत असतात. अजून पक्षाने पार्थ यांची उमेदवारीबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. पार्थ पवार फिरायला लागला म्हणून काय झाले ? फिरायला लागला  म्हणजे निवडणूक लढवणार, असं होत नाही. पक्षवाढीसाठी प्रत्येक जण काम करीत असतो. पार्थदेखील तेच करीत आहे."

मनसे पक्ष  महाआघाडीत  असायला हवी असे एका प्रश्नाचे उत्तर देताण अजित पवार यांनी सांगितले . ते म्हणाले," विद्यमान खासदारांची जागा कोणताही पक्ष सोडत नाही, इतर जागा सोडण्याबाबत विचार केला जातो. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. मनसेनेसुद्‌धा गेल्या वेळी एक लाख मतं घेतली होती. त्यामुळे शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी मनसेनेदेखील महाआघाडीत एकत्र आले पाहिजे."

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेसोबत आघाडी करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले होते. मात्र, आज अजित पवार यांनी मनसेला आघाडीसोबत येण्याचे आवाहन करीत नव्या राजकीय चर्चेला उधाण आणले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टीही महाआघाडीवर नाराज असल्याचे अजित पवार यांना विचारले असता, शेट्‌टी यांचा काही तरी गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असे ते म्हणाले.

या वेळी बारामतीचीही जागा जिंकणार, असे अमित शहा यांनी केलेल्या वक्‍तव्याची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. बारामतीबाबत त्यांचे वक्तव्य म्हणजे पोरकटपणा आहे. 2014 ला मोदी लाट होती. तरीही बारामती जिंकली आहे. त्यामुळे भाजपवाले बोलले म्हणजे सीट जिंकून येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख