दिल्लीच्या धर्तीवर शाळांसाठी ग्रामविकासचा वीस टक्‍के निधी : अजित पवार

शिक्षण हा राज्य सरकारचा प्राधान्याचा विषय राहील, असे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही ; परंतु, शासकीय निधीचा अपव्यय रोखला पाहिजे. यापूर्वी निर्णय घेतल्याप्रमाणे कायम विनाअनुदानित शाळांना टप्प्या- टप्प्याने अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
दिल्लीच्या धर्तीवर शाळांसाठी ग्रामविकासचा वीस टक्‍के निधी : अजित पवार

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर इथल्या महापालिकांच्या शाळांचा विकास करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शाळांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत 25-15 लेखाशिर्षातून 20 टक्के तर रस्त्यांसाठी 30 टक्के निधी देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. 

शिक्षण हा राज्य सरकारचा प्राधान्याचा विषय राहील, असे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही ; परंतु, शासकीय निधीचा अपव्यय रोखला पाहिजे. यापूर्वी निर्णय घेतल्याप्रमाणे कायम विनाअनुदानित शाळांना टप्प्या- टप्प्याने अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी शिक्षण विभागाने शाळांची सर्वंकष पडताळणी करुन यादी वित्त विभागाला सादर करावी. वित्त विभागाने फेरपडताळणी करुन पात्र शाळांना अनुदान वितरणाची कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 

राज्यात पहिली ते दहावी पर्यंत इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा सक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगून ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात चांगले शिक्षण उपलब्ध करण्यासाठी धोरणामध्ये आवश्‍यक ते बदल करण्यात यावेत. जिल्हा परिषदांच्या शाळादुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांना देण्यात येणाऱ्या 25-15 लेखाशिर्षातून 20 टक्के निधी शाळांना देण्यात येईल. तसेच शाळांच्या वीजबिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी महाऊर्जाच्या (मेडा) माध्यमातून शाळांना सौरवीज प्रकल्प बसविण्यात येतील. दिल्लीच्या शाळांचा दर्जा सध्या देशामध्ये नावाजला जात आहे. या शाळांच्या धर्तीवर मुंबईसह पाच महानगरपालिकांच्या शाळांचा विकास करण्यात येईल. यादृष्टीने अभ्यास करण्याच्या सूचना बैठकीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना त्यांनी दूरध्वनीवरुन दिल्या. 

या महानगरांत हा प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर राज्यातील अन्य मोठ्या शहरातही टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येईल. शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड यांनी विभागाशी निगडित मागण्या मांडल्या. कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) ग्रामीण शाळांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांना देण्यात येणारे सादिल अनुदानात 50 कोटी रुपयांवरुन 114 कोटी रुपयांची वाढ करण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाच्या हिश्‍याचा निधी वेळेत वितरीत करण्याच्या निर्देशही पवार यांनी संबंधितांना दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com