`पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यातील वादामुळे कऱ्हाडात पूर`

`पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यातील वादामुळे कऱ्हाडात पूर`

कऱ्हाड : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादात रखडलेली गॅबीयनची पूरसंरक्षक भिंत झाली असती तर कऱ्हाडला पूराचा धोकाच उदभवलाच नसता, असा टोला पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज कराडला पत्रकार परिषदेत लगावला.

नदीकाठी धोका पातळीवर एक मीटरने वाढवून गॅबीयनची पूरसंरक्षक भिंत उभारू. त्याच्या कामाचा कार्यारंभ 30 ऑगस्टपूर्वी करु, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज कराड येथील पूरस्थितीची पाहणी करून पालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या पूरग्रस्तांची भेट घेवून पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री शिवतारे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरहून कऱ्हाडला पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार होते. मात्र हवाई वाहतूकीच्या अडचणीमुळे त्यांनी हवाई पाहणीचा निर्णय घेतला. त्यानुसार कऱ्हाड, उंब्रज, रेठरे परिसरात पूराची हवाई पाहणीही त्यांनी केली.

पुण्यासह माझ्या मतदार संघातही पुरस्थिती असल्याने येथे यायला वेळ झाल्याचे सांगत श्री. शिवतारे म्हणाले, 30 दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लोकांच्या हिताची कामे आवश्‍यक आहेत. तसेच काल मंत्रिमंडळाची बैठकही झाल्याचे त्यांनी सांगितले. 

कोयना धरणाचा विसर्गासह कोयना, कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीच्या विसर्ग पाहता अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवणे गरजेचे होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल त्याबाबत सकाळी कल्पना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्यावर अलमट्टीचा तीन लाख 27 हजार विसर्ग साडेचार लाख क्‍युसेकवर नेला. आजही अलमट्टीचा विसर्ग कमी झाल्याच्या अफवा उठत असून सध्या अलमट्टीतून तीन लाख 60 हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. या सर्व तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवून असल्याने येथे येण्यास विलंब झाल्याचे त्यांनी कबुली दिली. 

ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. चव्हाण व अजित पवार यांच्या कार्यकाळात गॅबीयन पध्दतीच्या 39 कोटी खर्चाच्या पूरसंरक्षक भिंतीचे काम सुरू झाले. त्यातील सुमारे 18 कोटी खर्च करून पहिला टप्पा पूर्ण झाला. मात्र संरक्षक भिंत गॅबीयन ऐवजी कॉक्रीटची करण्याचे टुमणे निघाल्याने श्री. चव्हाण व श्री. पवार यांच्या वादात ती रखडली. ही भिंती झाली असती तर आजच्यासारखी पूरस्थिती उदभवलीच नसती. दोघांच्या वादामुळे कऱ्हाडला पुराचा फटका बसला. मात्र युती शासन भिंतीचे हे काम पूर्णत्वास नेईल. 39 कोटींच्या काम सुधारीत करण्याचे निर्देश दिले असून दोन दिवसात त्याच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून दहा दिवसाच्या कालावधीची निविदा प्रक्रीया राबवली जावून 25 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान गॅबीयन भिंतीच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून कामासही सुरवात होईल. 567 मीटरला धोका पातळी असून धोका पातळीच्या वर आणखी एक मीटरने ही भिंत बांधली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com