Ahmednagar District Bank Happy over Farmers Loan Waiver Scheme | Sarkarnama

आशिया खंडातील सर्वात मोठी जिल्हा सहकारी बॅंक कर्जमाफीने खूष

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अटी व शर्तींविना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्हा सहकारी बॅंकेची मोठी वसुली होणार आहे. वर्षानुवर्षे कर्ज व त्यावरील थकीत व्याज एकाच वेळी मिळणार असल्याने व्यवस्थापनाची आकडेवारी जमा करण्याबाबत धावपळ सुरू झाली आहे. 

नगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्याने नेमका कोणते कर्ज माफ होणार, याबाबत गोंधळाचे वातावरण असले, तरी दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याच्या घोषणेने सर्वसामान्य बहुतेक शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. आशिया खंडात सहकारी तत्त्वावर सर्वांत मोठी बॅंक असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकेने दोन लाख 85 हजार शेतकऱ्यांना वितरित केलेल्या सुमारे 2500 कोटी रुपयांच्या कर्जापैकी बहुतेक कर्ज माफ होणार असल्याने जिल्हा बॅंक खूष आहे. 

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातबारा कोरा करण्याबाबत शब्द दिला होता. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याची मागणी लावून धरली होती. आता सत्ता आल्यामुळे दोन्हीही पक्षाकडून शब्दपूर्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हाच सरसकट कर्जमाफीची मागणी होऊ लागली होती. ठाकरे यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अटी व शर्तींविना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्हा सहकारी बॅंकेची मोठी वसुली होणार आहे. वर्षानुवर्षे कर्ज व त्यावरील थकीत व्याज एकाच वेळी मिळणार असल्याने व्यवस्थापनाची आकडेवारी जमा करण्याबाबत धावपळ सुरू झाली आहे. 

सर्वसामान्यांच्या नजरा सेवासंस्थेकडे

सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कर्ज साधारणपणे दोन लाखांच्या आत असते. सेवा संस्थांकडे प्रत्येक वर्षी व्याज भरून थकीत न ठेवणारे शेतकरी जास्त असतात. हे सर्वच कर्ज माफ होईल की नाही, याबाबत शेतकरी सेवा संस्थेचे सचिव, अध्यक्षांकडे विचारणा करीत आहेत. तथापि, कर्ज कसे माफ होणार, याबाबत संदिग्धता असल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. सेवा संस्थांकडे पीककर्ज, शेतीसाठीच्या अवजारांसाठीचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी कोणते कर्ज किती माफ होणार, याबाबत साशंकता आहे. तसेच पतसंस्था, इतर बॅंकांकडे असलेल्या कर्जातही कशी सूट मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख