Ahmednagar Collector Rahul Dwivedi Took Cognizance of Twitter Message for Medicines | Sarkarnama

एका ट्विटची दखल घेत तासभरातच जिल्हाधिकाऱ्यांनी औषधे पोहोचवली घरपोच

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुकुंदनगर परिसर 'हॉट स्पॉट' जाहीर केला आहे. येथील अत्यावश्‍यक सेवाही बंद आहेत. दैनंदिन गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी महापालिकेकडे दिली आहे

नगर  : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मुकुंदनगर परिसर प्रशासनाने 'हॉट स्पॉट' जाहीर केला. परिणामी, येथील अत्यावश्‍यक सेवाही पूर्णपणे बंद आहेत. अशात आजारी आईच्या औषधांसाठी मुलाने थेट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाच ट्विटरवरून साद घातली. त्यांनीही याला प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात आवश्‍यक औषधे मुकुंदनगरमधील संबंधित मुलाच्या घरी पोच केली. जिल्हाधिकांऱ्यामधील दक्ष अधिकाऱ्यासह एका संवेदनशील माणसाचेही या निमित्ताने नगरकरांना दर्शन झाले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुकुंदनगर परिसर 'हॉट स्पॉट' जाहीर केला आहे. येथील अत्यावश्‍यक सेवाही बंद आहेत. दैनंदिन गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी महापालिकेकडे दिली आहे. महापालिकेने अत्यावश्‍यक वस्तूंची मागणी नोंदविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत. या हेल्पलाइन क्रमांकावर औषधांसाठी मुकुंदनगर येथील एक जण रविवारी (ता. 12) सायंकाळी संपर्क करीत होते. जवळपास दोन तास प्रयत्न करूनही क्रमांक बिझी येत होता.

त्या ट्विटची घेतली दखल

अखेर संबंधित नागरिकाने रविवारी रात्री आठ वाजता आपल्या अडचणीबाबत ट्विट केले. द्विवेदी यांनी तातडीने त्याची दखल घेत त्वरित प्रिस्क्रिप्शन मागविले. त्यानंतर संबंधित औषधे प्रशासकीय यंत्रणेमार्फत नागरिकाच्या घरी पोचविली. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट घरपोच आलेली आवश्‍यक औषधे पाहून संबंधित परिवार अवाक्‌ झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या तत्परतेबद्दल या परिवाराने प्रशासन व प्रशासनप्रमुखांप्रती आभार व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख