Agriculture department is not getting full time minister & secretary | Sarkarnama

कृषी खात्याला वर्षभरापासून ना पूर्णवेळ मंत्री, ना पूर्णवेळ सचिव

प्रशांत बारसिंग
मंगळवार, 14 मे 2019

सप्टेंबरपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे देण्यात आला आहे. 

मुंबई :  निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतका-यांशी संबंधित असलेले राज्याच्या कृषी खात्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ मंत्री मिळालेला नाही. तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात कृषी खाते दुर्लक्षित राहिल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यापासून कृषी विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवला होता. त्यानंतर कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला. पाटील यांच्याकडे महसूल, मदत पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम अशी वजनदार खाती आहेत. अशातच पाटील हे गेले वर्षभर मराठा आरक्षण आंदोलन, दुष्काळी उपाययोजनांमध्ये अडकल्याने त्यांना कृषी खात्याकडे व्यवस्थित लक्ष देताना दमछाक होत आहे.

कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार 31 ऑगस्ट  2018 रोजी सेवानिवृत्त झाले. सप्टेंबरपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे देण्यात आला आहे. 

राज्यात दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. दुष्काळाचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर होतो. दुष्काळामुळे खचलेल्या शेतका-यांना उभारी देण्याचे काम कृषी खात्याच्या यंत्रणेला करायचे आहे. नवीन खरीप हंगाम तोंडावर आहे. पीककर्ज, खते, बियाणांचा पुरवठा हे विषय नजीकच्या काळात कळीचे असतील. 

अशावेळी कृषी खात्याला पूर्णवेळ सचिव देणे गरजेचे आहे. दरम्यान, कृषी खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ डवले यांच्याकडे द्यावी यासाठी हालचाली असल्याचे समजते . 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख