आगरी महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद 

आगरी महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद 

डोंबिवली : सालाबादप्रमाणे 9 ते 17 डिसेंबर या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेनेचे सभागृह नेते तथा डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचेच नाव प्रमुख पाहुण्यांच्या यादीतून वगळण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


महोत्सवाच्या आयोजन समितीत बहुसंख्य संघर्ष समितीचे पदाधिकारी आहेत. 27 गावे पालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी या निर्णयावर संघर्ष समिती ठाम होती. तर पालिकेतच गावे राहावीत असा शिवसेनेचा आग्रह होता. त्यामुळे या गावांचा मुद्दा ऐन निवडणूकीत चांगलाच पेटला होता. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री असा कलगीतुरा पाहावयास मिळाला होता. त्यामुळे 2015 साली आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवाच्या निमंत्रणपत्रीकेतून दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनाही वगळण्यात आले होते. त्यामुळे महापौरांनीही महोत्सवाकडे पाठ फिरवली होती. 

यंदा राजेश मोरे यांना निमंत्रणपत्रिकेतून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोरे हे आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे मोरे यांचे नाव राजकीय कटुतेमुळे वगळले गेले का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

महोत्सवाचे उदघाटक शैक्षणिक व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे असून प्रमुख उपस्थितांच्या यादीत मुख्यत्वे भाजपचे खासदार कपिल पाटील , पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नावे आहेत. एकंदरीत महोत्सवामध्ये भाजपाचा बोलबाला अधिक असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीविषयीही सांशकता व्यक्त होत आहे. 

आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे हे संघर्ष समितीचे देखील पदाधिकारी आहेत. त्यामूळे पुन्हा या महोत्सवाच्या व्यासपीठावर 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे असे वक्तव्य महोत्सवात केले होते. मात्र, आता दोन वर्षे उलटूनही याबाबत काहीच हालचाल न झाल्यामुळे यंदा ते काय नवीन वक्तव्य करतात ते पाहावे लागेल. 

* निमंत्रण पत्रिका मला मिळाली की नाही ते पाहावे लागेल. त्यानंतर महोत्सवात सहभागी व्हायचे की नाही ते ठरवू. 
राजेंद्र देवळेकर, महापौर, केडीएमसी 

* प्रमुख पदाधीकारी म्हणून इतरांप्रमाणे माझे नाव निमंत्रण पत्रिकेत असणे गरजेचे होते . मात्र नाव नसले तरी नाराजी बाजूला ठेवून मी आगरी समाजाचा असल्यामुळे समाजासाठी मी महोत्सवात सहभागी होईल. मात्र, अधिवेशनामुळे पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थिती असण्याची शक्‍यता कमी आहे. 
राजेश मोरे , सभागृह नेते तथा डोंबिवली शहर प्रमुख ( शिवसेना ) 


* आगरी महोत्सव हा सर्वॉंचा आहे. मोरे यांच्याबददल कोणतीही कटुता नाही. त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत अनावधानाने राहिले असावे किंवा प्रिंटिंग मध्ये घोळ झाला का हे तपासण्यात येईल. 
शरद पाटील, कार्याध्यक्ष, आगरी युथ फोरम 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com