agitation against mla anil gote in dhule | Sarkarnama

आमदार गोटेंनी दीनदयाळ उपाध्याय यांचा अपमान केला, त्यांची हकालपट्टी करा!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

'सोशल मीडिया'वर आक्षेपार्ह लिखाण आणि अपमान केल्याचा आरोप

धुळे : जनसंघाचे नेते तथा भाजपचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी 'सोशल मीडिया'वर आक्षेपार्ह लिखाण आणि अपमान केल्याचा आरोप करत या प्रकाराच्या निषेधार्थ भाजपच्या जिल्हा- महानगर शाखेने आज आमदार अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिमेचे प्रतीकात्मक दहन केले. त्यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. 

भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन मी भाजपचा एकनिष्ठ आहे, संघाचा स्वयंसेवक आहे, असा भास निर्माण करणाऱ्या आमदार गोटे यांनी (कै.) दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी 16 डिसेंबर 2018 ला त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह, निंदात्मक लिखाण केले. ज्यांच्या विचारधारेने देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री ते कार्यकर्ता पक्षाचे कार्य चालवत आहेत, अशा व्यक्तीबद्दल हे लिखाण असल्याने भाजप व परिवारातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याचा निषेध आहे, असे म्हणत भाजपच्या महानगर शाखेने आज येथील महाराणा प्रताप चौकात आमदार गोटे यांच्या प्रतिमेचे दहन केले. भाजपचे हिरामण गवळी, चंद्रकांत गुजराथी, बंटी धात्रक, शशी मोगलाईकर, रत्ना बडगुजर, माजी महापौर जयश्री अहिरराव, यशवंत येवलेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख