agitation against balu khandare in satara palika | Sarkarnama

शिवेंद्रसिंहराजेंच्या नगरसेवकाने अधिकाऱ्यासमोर उतरवली स्वतःची पॅन्ट

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

खंदारेंच्या कृतीचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून पालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचा सातारा पालिकेतील नगरविकास आघाडीचा नगरसेवक बाळू उर्फ विनोद खंदारे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. त्यानंतर स्वतःची पॅन्ट उतरवण्याची अभ्रद कृती केली. त्यामुळे पालिकेत गोंधळ उडाला. त्याच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

वॉर्ड क्रमांक सातमधील शौचालयाच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याची नगरसेवक खंदारे यांची तक्रार होती. सत्ताधाऱ्यांकडून आपले विषय जाणीवपूर्वक अडविले जात असल्याचा आरोपही खंदारे यांनी केला होता. आज सकाळी साडेदहा वाजता उपमुख्याधिकारी धुमाळ यांच्या दालनामध्ये खंदारे यांनी प्रवेश केला. आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. "तुम्ही आमची कामे करत नाहीत, आता मी इथेच घाण करतो' असा इशारा दिला. त्यानंतर अधिक आक्रमकपणे ते थेट टेबलावर चढले. त्यावर कहर करत स्वतःची पॅंट गुडघ्यापर्यंत खाली घेतली.

श्री. धुमाळ यांनी खंदारे यांना टेबलावरून उतरण्याची विनंती केली. तसेच त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. सभासचिव अतुल दिसले यांना समक्ष बोलावून स्थायीचा अजेंडा वाचायला दिला. विषयपत्रिकेवर शंभर व एकशे एक क्रमांकावर विषय घेण्यात आल्याचे समजताच खंदारे पॅंट घालून खुर्चीत बसले. तरीही नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्येही घाण करणार, असे इशारे खंदारे हे देतच होते. काही वेळानंतर खंदारे तेथून निघून गेले. या घटनेमुळे पालिकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
 
खंदारेंच्या कृतीचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून पालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. जोपर्यंत दहशतमुक्त वातावरण पालिकेत तयार होत नाही तोपर्यंत कोणीही काम करणार नाही, असे निवेदन कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे व मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिले. बाळू खंदारे यांची पालिका कर्मचाऱ्यांना नेहमीच दमदाटीची भाषा असते. त्यामुळे कर्मचारी तणावात असून कामकाज कालावधीनंतर त्यांना त्यांच्या जीवाची शाश्वती राहिली नाही. त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, शासकीय कामकाजात लोकप्रतिनिधीच अडथळा आणू लागले तर आम्ही दाद कोणाकडे मागायची? असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. सोमवारी (ता. 16) पालिकेची सभा होत असून, या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख