जानकरांविरोधात मच्छीमारांची घोषणाबाजी 

पारंपरिक मच्छीमारांनी आधुनिकतेची कास धरावी, असे वक्तव्य करणाऱ्या मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मच्छीमारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
जानकरांविरोधात मच्छीमारांची घोषणाबाजी 
जानकरांविरोधात मच्छीमारांची घोषणाबाजी 

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : पारंपरिक मच्छीमारांनी आधुनिकतेची कास धरावी, असे वक्तव्य करणाऱ्या मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मच्छीमारांनी जोरदार घोषणाबाजी केली. जानकरांच्या  मुद्यांवर न बोलता श्री. चव्हाण यांनी शासन मच्छीमारांच्या पाठीशी असून त्यांच्या समस्या दूर करताना आवश्‍यक सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. 

भाजपच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या मच्छीमार शिवार संवाद यात्रेचा शुभारंभ गुरुवारी सर्जेकोट बंदर येथे श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी हा प्रकार घडला. श्री. जानकर यांनी नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात आधुनिक मासेमारीचे समर्थन केले होते. पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणेही ऐकून घेतले नव्हते. याचे पडसाद यावेळी उमटले.

आचरा येथील महिला कार्यकर्त्या आकांक्षा कांदळगावकर यांनी यावेळी आक्रमकपणे आपल्या समस्या मांडल्या. थेट आमच्यासमोर दादा, भाई कोणीही आले तरी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, आम्ही कर्जमाफीसाठी लढत नसून अवाजवी बसविण्यात आलेले व्याज कमी करण्यासाठी लढत आहोत. पर्ससीन विरोधात लढा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मच्छीमारांची बाजू घेत पर्ससीन बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत. मात्र आज त्यांच्याच मंत्रिमंडळातील मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी पर्ससीनवर जाऊन मासेमारीचा सर्व्हे केला. त्यामुळे ते काय सर्व्हे मंत्री आहेत काय? शासन कोणतेही असो आमच्यात शासनाला झुकविण्याची हिंमत आहे. मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. असे सांगून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे त्या म्हणाल्या. यावर मच्छीमारांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दिला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास हडकर यांनी तर आभार गंगाराम आडकर यांनी मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com