after spending 3 crore pot holes not repaired | Sarkarnama

तीन नेत्यांनी घेतले श्रेय, तीन कोटी झाले खर्च तरी रस्त्याचे तीनतेरा

विलास काटे
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

आळंदी : सुमारे सव्वा तीन कोटी रूपये निधीतून लोणीकंद- मरकळ- आळंदी या सतरा किलोमीटरच्या राज्य महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे आणि भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी हवेली आणि खेड हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहा महिन्यांपूर्वी केले.

आळंदी : सुमारे सव्वा तीन कोटी रूपये निधीतून लोणीकंद- मरकळ- आळंदी या सतरा किलोमीटरच्या राज्य महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे आणि भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी हवेली आणि खेड हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहा महिन्यांपूर्वी केले.

एकाच ठिकाणी सत्तेत राहूनही सेना भाजपाच्या श्रेयवादाची लढाई सर्वसामान्यांनी दहा महिन्यांपूर्वी पाहिली. दोन्ही नेत्यांची जाहिरातबाजी केली. मात्र सव्वा तीन कोटी खर्चूनही अद्याप रस्त्यातील खड्डे बूजले नाहीत. रस्त्यातील मोठाल्या खड्ड्यांना जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग की दोन नेते आणि एवढा मोठा निधी नेमका खर्चला कुठे असा सवाल ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांकडून विचारला जात आहे.
 
लोणीकंद -मरकळ- आळंदी या राज्य महामार्गाचे सुधारणा व दोन वर्षे देखभाल दुरूस्तीचे कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यासाठी सव्वी तीन कोटी रूपयांचा निधी खर्च केला. उरूळी कांचनच्या कांचन कन्स्ट्रक्शन कंपनीने काम केले. सेना भाजपाच्यावतीने आपणच रस्त्यासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याचा दावाही दोन्ही नेत्यांनी केला. नेते मंडळी एवढ्यावरच थांबली नाही तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी या रस्त्याचे भूमिपूजन मागील वर्षी डिसेंबर महिन्यात केले. बरोबर दहा महिन्यांपूर्वी सकाळच्या सत्रात भाजपाचे शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते तुळापूर तर सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार सुरेश गोरे यांनी मरकळ येथे दुपारी भूमीपूजन केले. विषेष म्हणजे या कामाचे दोन स्वतंत्र फलकही लावण्यात आले. आजही फलक त्याच ठिकाणी दिमाखात उभे आहेत.
 
लोकांना वाटले आता एवढा मोठा निधी म्हणजे रस्ता एकदम खासच होणार. कारण निवडणूक तोंडवर आली. आता आपल्याला कोणी फसविणार नाही हीच भावना नागरिकांची होती. मात्र अवघ्या दहा महिन्यांतच नागरिकांच्या पदरी निराशा आली. आळंदी ते लोणीकंद फाट्यापर्यंतचा प्रवास जो कोणी करेल त्याला खड्ड्यांचा सामना करावाच लागत आहे. काही ठिकाणी एक फुटापेक्षा जास्त खड्डे आहे. मरकळ सोडून लोणीकंदच्या दिशेने जसजसे पुढे जावू तस तसे खड्ड्यांचे प्रमाण वाढतच आहे. आता या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रूपये निधी नेमका गेला कुठे आणि नेमके काम झाले कुठे हाच सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. 

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार बाबुराव पाचर्णे यांनी वर्चस्वासाठी फ्लेक्सबाजी करून जाहिरातबाजी केली,पण रस्त्यातील खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी पुढाकार कुणीच घेतला नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख