After Raj Thakray's Tour MNS Aurangabad swings in to action | Sarkarnama

राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर औरंगाबादची मनसे लागली कामाला !

जगदीश पानसरे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

औरंगाबादेत महापालिकेतील वाढीव स्वच्छता कराच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी मनसे कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे.

औरंगाबाद:  मल्टीप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेऊ देण्यासाठीचा लढा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यशस्वी केल्यानंतर आता औरंगाबादेत महापालिकेतील वाढीव स्वच्छता कराच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी मनसे कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वदिनीच जन आक्रोश आंदोलन करण्याची घोषणा पक्षाने केली आहे. 

मनसे प्रमुख राज ठाकरे व त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला. पक्ष बांधणी आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यासाठीचा हा दौरा. जुन्याच सहकाऱ्यांवर विश्‍वास दाखवत राज ठाकरे यांनी संघटनेत फारसे बदल न करता फक्त खांदेपालट केला होता. पण हा खांदेपालट देखील मरगळ आलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरणारा ठरल्याचे दिसते. 

खळ खट्याक आणि न्यायालयाच्या दणक्‍यानंतर राज्यातील मल्टीप्लेक्‍समध्ये प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास परवानगी मिळाली. दरम्यान, औरंगाबादेत देखील मनसेच्या चित्रपट शाखेने आंदोलन छेडत मल्टीप्लेक्‍स चालकांना इशारा दिला होता. अर्थात नंतर राज्य सरकारने घुमजाव केल्यामुळे मनसेचा हा लढा कितपत यशस्वी ठरला हे वादादीतच आहे. 

पण जनतेच्या प्रश्‍नांना हात घालत आंदोलनाचा धडाका आगामी काळात मनसे लावणार एवढे मात्र निश्‍चित. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अजूनही पुर्णपणे संपलेला नाही. पण शहर कचरामुक्त केल्याच्या थाटात महापालिकेने शहवासियांवर 365 दिवसांसाठी म्हणजेच एका वर्षासाठी 3650 रुपये इतका स्वच्छता कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरात अद्यापही जागोजागी कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत, महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करता आलेला नाही. असे असतांना जो कचरा साफच केला जात नाही त्या कचऱ्याच्या स्वच्छतेसाठी महापालिका स्वच्छता कर कशी आकारू शकते असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. 

हाच जिव्हाळ्याचा प्रश्‍न घेऊन मनसेने 14 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या हिटलरशाही विरोधात मुख्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका पाहता मनसे शहरात आपले बस्तान पुन्हा बसवू पाहत आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपला पुढील काळात मनसेच्या आक्रमक आंदोलनाला तोंड द्यावे लागणार एवढे मात्र निश्‍चित.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख