राहुल यांची धुळ्यातील सभा मोदींपेक्षा जोरात करण्याचे अशोकरावांपुढे आव्हान

राहुल गांधी यांची धुळ्याची सभा जोरात करण्याचे आव्हान काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर आहे. खानदेशातील राजकीय वातावरण नेत्यांच्या दौऱ्यामुळे सध्या तापलेले आहे.
राहुल यांची धुळ्यातील सभा मोदींपेक्षा जोरात करण्याचे अशोकरावांपुढे आव्हान

जळगाव : ऊन तापू लागताच खानदेशातील राजकीय आखाडाही तापत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आदींच्या प्रचारसभा झाल्या. तर येत्या १ मार्च रोजी काॅँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळ्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जळगावात सभा होणार आहेत.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांत जळगाव जिल्ह्यात सपाटून मार खाऊन सैरभैर झालेली काॅँग्रेस व धुळे, नंदुरबारसह जळगावात कमकुवत झालेल्या राष्ट्रावादी काॅँग्रेसला या सभांनी उर्जितावस्था मिळेल काय? असा मुद्दा सध्या चर्चेत आहे. 

खानदेशात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. सोबतच देशपातळीवरील नेत्यांच्या खानदेशात सभांचा धडाका सुरू आहे. खानदेशात नंदुरबार, धुळे, जळगाव व रावेर या सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे खासदार आहे. यात धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन भाजपने मराठा समाजाला सोबत घेतले. धुळे पालिकेत भाजपमध्ये गटबाजी उफाळलेली असतानाही सत्ता मिळविली. राष्ट्रवादी काॅँग्रेसला तेथे सत्ता गमवाली लागली. जळगाव पालिकेतही शिवसेना नेते सुरेश जैन यांच्या ३५ वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला. जळगाव जिल्ह्यात काॅँग्रेसचा एकही आमदार, खासदार नाही. अपवाद वगळता कुठली पालिका, पंचायत समिती काॅँग्रेसकडे नाही. 

राष्ट्रवादी काॅँग्रेसचे एकच आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या रूपाने विधानसभेत निवडून आले होते. जळगाव जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. धुळ्यात काॅँग्रेसचे तीन आमदार व जिल्हा परिषदेत सत्ता, अशी ताकद आहे. नंदुरबारातही काॅँग्रेसचे दोन आमदार आहे. तर नंदुरबार पालिका काॅँग्रेसने मध्यंतरी झालेल्या निवडणुकीत राखली. भाजपची ताकद वाढल्याने सत्तेसाठी संघर्ष कराव्या लागणाऱ्या दोन्ही काॅँग्रेसमध्ये मरगळ आल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काॅँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे कार्यकर्त्यांमध्ये उर्जितावस्था आणण्यासाठी काय मंत्र देतात, कोणते बळ देतात, याकडे लक्ष लागून आहे. 

लोकसभेचा आखाडा गाजू लागला 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १६ फेब्रुवारी रोजी धुळ्यात प्रचारसभा व विकासकामांच्या शुभारंभानिमित्त येऊन गेले. गुरुवारी (ता. २१) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धरणगावात खाज्याची नाईक स्मृती संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त धरणगावात येऊन गेले. नंतर भुसावळातही त्यांची सभा झाली. धरणगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशीदेखील होते. भारिप बहुजन महासंघ, एमआयएम यांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांची मागील आठवड्यातच मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे सभा झाली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभाही पाचोरा येथे मागील पंधरवड्यात नियोजित होती. पण ती ऐववेळी रद्द झाली. आता ५ मार्च रोजी राष्ट्रवादी काॅँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जळगावात व तत्पूर्वी १ मार्चला काॅँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी धुळ्यात सभा घेणार असल्याने लोकसभा निवडणुकांचा आखाडा चांगलाच गाजू लागल्याचेही चर्चिले जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com