अब्दुल सत्तारांच्या शिवसेना प्रवेशाने सिल्लोड भाजपमध्ये सन्नाटा !

तिकडे भाजपच्या कार्यालयात मात्र 'इतना सन्नाटा क्‍यू है भाई' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
Sattar-enters-ShivSena
Sattar-enters-ShivSena

औरंगाबादः भाजप प्रवेशासाठी आटापिटा प्रसंगी, कार्यकर्त्यांशी दोन हात करण्याच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेस बंडखोर माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश करत सगळ्यांनाच धक्का दिला.

 महाजनादेश यात्रेच्या स्वागतावरून भाजप कार्यकर्त्यांशी भडका उडाल्यानंतर सत्तारांनी थेट मुख्यंत्र्यांचा हात पकडत बसमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे स्वागत केल्यामुळे सत्तारांचा भाजप प्रवेश निश्‍चित समजला जात असतांना त्यांनी मातोश्रीची वाट धरली, आणि आज गणेश आगमनाच्या मुर्हूतावर भगवा हाती घेतला. सत्तारांच्या या धक्कातंत्रामुळे सिल्लोड भाजपमध्ये मात्र सध्या सन्नाटा पसरला आहे. 

गेली वीस-पंचवीस वर्ष ज्या अब्दुल सत्ताराच्या विरोधात लढा दिला, त्यांनाच पक्षात प्रवेश दिला, तर त्यांना पाडू असा इशारा देत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ' गड्यानो राजकारणात असं चालतंच असतं, पक्ष वाढवण्यासाठी अशा गोष्टी कराव्याच लागतात' असे सांगत सत्तारांसोबतची मैत्री निभावण्याचा प्रयत्न देखील केला. पण दानवे यांच्या चकव्याचा अनुभव असल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्तारांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शवला होता. 

तेव्हाच सत्तार यांना मातोश्रीवर जाण्याचा सल्ला भाजपमधील धुरीणांनी दिला होता, हे आजच्या प्रवेशावरून स्पष्ट होते. महाजनादेश यात्रेतील तणावाच्या परिस्थीतीनंतर मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांच्यासाठी भाजपचे दार बंद केले खरे, पण हे करत असतांना त्यांच्यासाठी शिवसेनेचे दुसरे दार मात्र उपलब्ध करून दिले.

महाजनादेश यात्रे दरम्यान झालेल्या स्वागत सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सुरेश बनकर, ज्ञानेश्‍वर मोठे, इद्रीस मुल्तानी यांच्यासाठी आशिर्वाद मागितला. त्यामुळे सत्तार यांचा भाजप प्रवेश टळल्याचा आनंद स्थानिक भाजप नेत्यांना झाला होता. पण सत्तार यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत हा आनंद हिरावून घेतला. 

 भगव फडकला 
सत्तार यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयावर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कॉंग्रेसचा झेंडा फडकत होता. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवत बंड पुकारले आणि तेव्हापासून कॉंग्रेसचा झेंडा झाकून ठेवण्यात आला होता.

भाजप प्रवेशाचे प्रयत्न सुरू असल्यामुळे सत्तार मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांच्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो तेवढे झळकायचे. पण या सगळ्या घडामोडीला आज वेगळीच कलाटणी मिळाली आणि सत्तार यांच्या कार्यालयावर थेट भगवाच फडकला. 

युतीमध्ये भाजपकडे असलेला हा मतदारसंघ गेल्या दहा वर्षापासून सत्तार यांच्या रुपाने कॉंग्रेसने जिंकला होता. आता सत्तार यांना शिवबंधन बांधत शिवसेनेने हा मतदारसंघ स्वःतासाठी सोडवून घेतल्याचे समजते.

सत्तार यांचा पक्ष प्रवेश उमेदवारीच्या अटीवरच झाल्यामुळे भाजपने देखील सहकार्यांची भूमिका घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे सत्तार यांचा भाजप प्रवेश रोखण्यात स्थानिक पदाधिकारी, नेत्यांना यश आले असले तरी, त्यांच्यावर आता मतदारसंघच गमावण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागेल. 

एकंदरीत सत्तार यांच्या प्रवेशामुळे सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात शिवेसना आता झिरो टू हिरो होण्याच्या मार्गावर आहे. सत्तार समर्थकांनी शिवसेना प्रवेशाचे फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत स्वागत केले. तर तिकडे भाजपच्या कार्यालयात मात्र " इतना सन्नाटा क्‍यू है भाई' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com