After 36 hours of deliberations Sachin Pilot gives in | Sarkarnama

रुसलेल्या सचिन पायलटांनी छत्तीस तासानंतर राहुल गांधींचे ऐकले !

सरकारनामा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मध्यप्रदेशमध्ये जर कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष असलेल्या कमलनाथ यांना मुख्यमंत्री केले तर तोच न्याय आपल्याला लावावा असा आग्रह सचिन पायलट यांनी धरला होता.

दिल्ली :  राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात अखेरपर्यंत तीव्र स्पर्धा राहिली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी गेल्या 36 तासात सचिन पायलट यांच्याशी अनेक वेळा चर्चा करून अखेर त्यांची समजूत काढली.

राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय युवक नेत्यांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबरीने सचिन पायलट यांचेही नाव घेतले जाते.

गेल्या दोन दिवसांपासून राजस्थानमध्ये सत्तेच्या सर्वोच्च पदासाठीचा सत्तासंघर्ष आज शुक्रवारी दुपारी चार वाजता संपला. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा ही विधिमंडळाच्या बैठकीत केली जाते.

गुरुवारी रात्री उशिरा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी कमलनाथ यांच्या नावाची घोषणा मध्यप्रदेशच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत करण्यात आली होती.

राजस्थानमध्ये मात्र या परंपरेला फाटा देत कॉंग्रेस पक्षाने अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन केली.

सचिन पायलट हे राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे जानेवारी 2014 पासून अध्यक्ष आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे राजस्थानमध्ये पानिपत झाले होते. आमदारांची संख्या वीस-बावीसवर घसरली होती.

पक्ष गटबाजीने पुरता पोखरून गेलेला होता. अशा परिस्थितीत आपण पक्षाची धुरा हातात घेऊन राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे 100 आमदार निवडून आणले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद आपल्यालाच मिळायला हवे असा आग्रह सचिन पायलट यांनी धरला होता.

मध्यप्रदेशमध्ये जर कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष असलेल्या कमलनाथ यांना मुख्यमंत्री केले तर तोच न्याय आपल्याला लावावा असा आग्रह सचिन पायलट यांनी धरला होता.

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी आणि गुज्जर समाजाने 'अलवार'जवळ रास्ता रोको केला होता. मंगळवारपासून पायलट यांचे समर्थक आक्रमक होऊन जागोजागी पायलट यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन करताना दिसत होते.

गुरुवारी रात्री अशोक गेहलोत यांचे नाव निश्‍चित झाले होते मात्र पायलट यांचा विरोध कायम होता असे समजते. त्यामुळे दिल्लीहून राजस्थानसाठी निघालेल्या अशोक गेहलोत यांना विमानतळावरून राहुल गांधींनी परत बोलावले होते. गुरुवारी रात्री गेहलोत राहुल गांधींच्या निवासस्थानी गेले तेव्हा पायलट तेथून बाहेर पडत होते. यावेळी पायलट आणि गेहलोत यांच्यात संभाषणही झाले नाही.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेहलोत यांच्या सारख्या धुरंधर नेत्यास नाराज करणे परवडणार नाही. त्यांचा अनुभवाचा पक्षाला लाभ होईल असे शुक्रवारी राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी खूप समजवल्यानंतर सचिन पायलट राजस्थानचे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाल्याचे समजते.

सचिन पायलट हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. राजेश पायलट यांचे चिरंजीव आहेत. 41 वर्षाचे सचिन पायलट यांनी अमेरिकेतील 'व्हार्टन' युनिव्हर्सिटीमधून एमबीएची पदवी संपादन केली आहे. त्यांनी अमेरिकेच्या जनरल मोटर्स कंपनीत दोन वर्षे नोकरी केलेली आहे.

सचिन पायलट यांनी बीबीसीच्या दिल्ली ब्युरोतही काम केले आहे. वडिलांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला. वयाच्या सव्विसाव्या वर्षी 2004 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्येही ते पुन्हा खासदार झाले. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

राजस्थान विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत टोंक मतदारसंघातून ते 50 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.

काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांचे ते जावई आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख