वीस वर्षाच्या संघर्षानंतर जनतेने मला आमदार केले

आता राजकारण सोडून द्यावे, आमदारकी आपल्या नशिबात नाही असा विचार मनात आला.पण म्हणतात ना, 'समय से पहिले, और नसीब से जादा किसी को नही मिलता' हे माझ्यासाठी अगदी खरे ठरले.
Udaysinh-Rajput-ss
Udaysinh-Rajput-ss

औरंगाबादः माझे वडील सरदारसिंग दगडूसिंग राजपूत 1978 मध्ये अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेत निवडून  आले. पण अठरा महिन्यांनी जिल्हा परिषद बरखास्त झाली आणि त्यांचे राजकारण संपले. आमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती. शेती बऱ्यापैकी असल्यामुळे माझ्याकडे मोटारसायकल, जीप होती. नागद सारख्या खेड्या गावात दोन वाहन असण म्हणजे मोठी गोष्ट समजली जायची.

त्यामुळे अडीअडचणीला, कुणाला साप चावला, कोणी आजारी असले, गरोदर महिलेला रुग्णालयात न्यायचे असेल तर त्यांना मदत करायचो. पण ही मदत आणि लोकांसाठी केलेले कामच पुढे मला राजकारणात घेऊन जाईल याचा कधी विचारही केला नव्हता. वडीलांप्रमाणे जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरूवात केली आणि वीस वर्षाच्या संघर्षानंतर जनतेने मला आमदार केले.

शालेय शिक्षण आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतल्यानंतर घरातील मोठा म्हणून शेती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शेती करत असतांनाच गावांतील लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा माझा स्वभाव होता. रात्री-अपरात्री कुणीही आले तरी त्यांना मी निराश केले नाही, त्यामुळे लोकांशी पहिल्यापासूनच माझा संपर्क चांगला होता.

त्यातूनच 2002 मध्ये मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी मागणी गावातील काही लोकांनी केली. वैयक्तिक मदतीला जर व्यापक स्वरूप देऊन गावासाठी काही ठोस काम करायचे असेल तर नशीब आजमवायला काय हरकत आहे? असा विचार करून तयारीला लागलो.

शिवसेनेकडून अंधारी-नागद सर्कलमधून उमेदवारी मिळाली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्‍य घेऊन निवडून  येणारा मी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा परिषद सदस्य ठरलो. विरोधी उमेदवाराचा मी तब्बल 4700 मतांनी पराभव केला होता. 

जि.प. सदस्य म्हणून गावातील प्रश्‍न सोडवत असतांना दोन वर्ष कशी उलटली हे समजलेच नाही. 2004 च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि ज्यांनी जिल्हा परिषद लढवण्याचा आग्रह केला त्याच मायबाप जनतेने भाऊ तुम्ही आता आमदारकीची निवडूणक लढवा असा आग्रह धरला.

दोन वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल्यामुळे राजकारण जवळून पाहता आले.  लोकांचे प्रश्‍न, ग्रामीण भागातील समस्या मांडून  काही प्रमाणात त्या सोडवता आल्या. त्यामुळे विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. 

अर्थात ज्या पक्षाने जिल्हा परिषद सदस्य केले, त्याच पक्षाकडे उमेदवारी मागितली, पण ती नाकारण्यात आली. बंडखोरीचा स्वभाव नसूनही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडूणक लढवली. पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी 34 हजार मतांचे दान माझ्या पारड्यात टाकले. पण 1700 मतांनी आमदार होण्याची माझी संधी हुकली.

निवडणूक हरलो, विश्‍वास जिंकला..
निवडणूकीत मी थोडक्‍या मतांनी हरलो असलो तरी जनतेचा लाखमोलाचा विश्‍वास मी जिंकलो होतो. त्या विश्‍वासाच्या जोरावर पाच वर्ष लोकांच्या संपर्कात, सानिध्यात राहिलो, पुन्हा 2009 च्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांनी संधी नाकारल्यामुळे अपक्ष लढलो. यावेळी मला 42 हजार मते मिळाली, साडेतीन हजार मतांनी पुन्हा वाट पहायला लावली. 

भाऊ आमदार व्हायला पाहिजे होते ही सर्वसामान्यांची इच्छा, अपुरी राहिली. तिसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून मैदानात उतरलो. नशीब आपल्यावर किती दिवस रुसेल म्हणत लोकांचा आशिर्वाद मागितला. 61 हजार मतदारांनी माझ्यासाठी मतदान केले, पण माझा संघर्ष अजून संपलेला नव्हता. देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या मोदी लाटेत मी अवघ्या चौदाशे मतांनी पुन्हा पराभूत झालो.

आता राजकारण सोडून द्यावे, आमदारकी आपल्या नशिबात नाही असा विचार मनात आला. पण गेल्या पंधरा वर्षांपासून माझ्यासाठी मतदान करणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काय चुकले? त्यांच्यासाठी पद नसले तरी आपल्यापरीने काम करत राहायचे असा निर्धार करत मी कार्यरत राहिलो. पण म्हणतात ना, 'समय से पहिले, और नसीब से जादा किसी को नही मिलता' हे माझ्यासाठी अगदी खरे ठरले.

जनतेचे प्रेम, नशिबाची साथ मिळाली...
माझ्या आयुष्यातली चौथी विधानसभा निवडणूक मी लढलो. ज्या शिवसेनेने मला जिल्हा परिषद सदस्य केले, त्याच शिवसेनेकडून मी आमदार व्हावं अशीच बहुदा देवाचीही इच्छा होती. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी पक्षात प्रवेश तर दिलाच, पण विधानसभेची उमेदवारीही दिली. 

वीस वर्षाच्या संघर्षाचे फळ मिळण्याची हीच ती वेळ होती. जनतेशी ठेवलेला संपर्क, त्यांची केलेली कामे याची पावती 2019 मध्ये विजयाच्या रुपाने मला मिळाली. पराभवाने मी कधी खचलो नाही, आणि विजयाने उन्मतही होणार नाही.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संधी दिल्यामुळे मी आमदार झालो, माझ्या सुदैवाने तेच राज्याचे मुख्यमंत्रीही झाले आहेत. मिळालेल्या संधीच सोनं करून येत्या पाच वर्षात पंधरा वर्षात झाले नाही एवढे काम करण्याचा ध्यास करून मी वाटचाल करतो आहे.

(शब्दांकन :  जगदीश पानसरे)  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com