Aditya Thakrey Speech In Malegaon For Campaing Shivsena Candidate Dada Bhuse | Sarkarnama

शिवसेनेला कर्ज, बेरोजगार मुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

''राज्यात मला सर्वत्र प्रेम मिळते. मला पदासाठी नव्हे तर कर्ज, बेरोजगारी, प्रदुषण यापासुन मुक्त असलेला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. माझा मतदारसंघ वरळी असला तरी सर्व महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला मंत्रालयात अन्यथा कुठेही बसवा माझे पाय जमिनीवरच राहतील. ही निवडणूक मी एक स्वप्न घेवून लढतोय. त्याच्या स्वप्नपुर्तीसाठी साथ द्या,'' असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

मालेगाव : ''राज्यात मला सर्वत्र प्रेम मिळते. मला पदासाठी नव्हे तर कर्ज, बेरोजगारी, प्रदुषण यापासुन मुक्त असलेला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. माझा मतदारसंघ वरळी असला तरी सर्व महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला मंत्रालयात अन्यथा कुठेही बसवा माझे पाय जमिनीवरच राहतील. ही निवडणूक मी एक स्वप्न घेवून लढतोय. त्याच्या स्वप्नपुर्तीसाठी साथ द्या,'' असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री, उमेदवार दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे व्यासपीठावर होते. यावेळी ठाकरे म्हणाले, ''की लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी लढतो आहे. शिवसेना काम करतांना जात, धर्म, पंथ असा कुठलाही भेद करत नाही. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहिरनामा स्वहिताचा आहे. राज्यमंत्री दादा भुसे यांनी उल्लेखनीय काम केले आहेत. आगामी काळात त्यांची जबाबदारी वाढणार. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळणार.'' पुढील विकासासाठी भुसे यांना मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.

''राज्यात साडेनऊ वर्ष वगळता कॉंग्रेसच सत्तेवर होते. कॉंग्रेसजनांनी आपसात भांडणे लावून सत्तेत मजा मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 370 ला विरोध करून राष्ट्रवादी म्हणविण्याचा हक्क घालविला. आम्ही सत्तेत राहून शेतकरी बांधवांसाठी संघर्ष केला. आगामी काळात ठिबक सिंचन प्रत्येक शेतात नेणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार. राज्यात प्रथमच शेतकऱ्यांसाठी मुंबईत मोर्चा निघाला. पीकविमा मिळाला. आगामी काळात प्रत्येक जिल्हा व तालुक्‍यात महिला बचत भवन व केंद्र, गाव ते शाळा विद्यार्थ्यांसाठी बससेवा. राज्यात अभ्यासक्रमाचा समान दर्जा, रस्त्यांची सुधारणा, मुख्यमंत्री शहर सडक योजना, वीजदर कपात, प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज यासह निरोगी महाराष्ट्र करायचाय. राज्यात एक हजार भोजनालयातून सकस थाळी. महिला बचत गटांना काम देणार, दहा रूपयांत गरजूंना जेवण देणारच.'' अशीही आश्वासने त्यांनी दिली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, बंडुकाका बच्छाव, मनपा गटनेते सुनील गायकवाड, नितीन पोफळे, विवेक वारूळे, निलेश कचवे, लकी गिल, भारत चव्हाण, विनोद वाघ, ज्योती भोसले, आशा अहिरे, छाया शेवाळे, प्रमोद शुक्‍ला, रामा मिस्तरी, संजय दुसाने, यु. आर. पाटील, विकास केदारे, भिकन शेळके आदी व्यासपीठावर होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख