Aditya Thakare reaches Shahapur 3 hours late | Sarkarnama

शहापुरातील प्रचार सभेला आदित्य तब्बल 3 तास उशिराने आले !

सरकारनामा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

आनंद दिघे यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी गेलेल्या दरोडा यांना राखीव मतदारसंघातून 5 वेळा उमेदवारी दिली. ते 2 वेळा का पडले, याची कारणे तालुक्‍यातील शिवसैनिकांना माहिती ! -एकनाथ शिंदे

शहापूर : राज्यातील 111 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करताना महाराष्ट्राचा रंग हा भगवा असल्याचे दिसले. म्हणूनच मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

नवा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी मला तुमचे सर्वांचे मत हवे आहे, यासाठी मी आज शहापुरात आलो, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. शहापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आकाश सावंत मैदानात झाली. या वेळी ते बोलत होते.

शहापुरातील सावंत मैदानात झालेल्या या प्रचार सभेला आदित्य तब्बल 3 तास उशिराने आले. रणरणत्या उन्हात बसलेल्या शिवसैनिकांची त्यांनी माफी मागून स्वतः उन्हात उभे राहत भाषणास सुरुवात केली.

राज्यातील अनेक जिल्ह्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनेक एमआयडीसी मंजूर केल्या आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कंपन्या आणून त्यात प्राधान्याने स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची अट घालणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

नवा महाराष्ट्र घडवताना प्रत्येक तालुक्‍यात मेडिकल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महिला सक्षमीकरण, गाव ते शाळा बससेवा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण, स्वस्त आणि मस्त दहा रुपयांत जेवण देणारी हजार केंद्रे उघडणार असल्याचे आश्वासन आदित्य यांनी दिले. या सभेला भाजप पदाधिकारी गैरहजर होते. भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याने गैरहजर असल्याचे भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी  शहापूर मतदारसंघात आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर टीकास्त्र सोडले.

जनतेची कामे केली असती, तर ही वेळ आली नसती. आनंद दिघे यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी गेलेल्या दरोडा यांना राखीव मतदारसंघातून 5 वेळा उमेदवारी दिली. ते 2 वेळा का पडले, याची कारणे तालुक्‍यातील शिवसैनिकांना माहिती असल्याचे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख