राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर भवनासाठी मुंबईत जागा देणार : आदित्य ठाकरे

तत्कालीन कॉंग्रेस आघाडीच्या काळात अपांरपरिक ऊर्जा मंत्री असलेल्या विनय कोरे यांनी 2007-08 ला दादर शिवाजी पार्क येथील कोल्हापूर महोत्सवात ही मागणी केली होती. त्यानंतर सातत्याने ही मागणी विधानभवनात लावून धरली.
Aditya_Thakrey
Aditya_Thakrey

मुंबई : लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने मुंबईत कोल्हापूरवासियांसाठी भव्य असे कोल्हापूर भवन उभारण्यासाठी मुंबईत जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे माहिती शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. 

मात्र, मुंबईत ही जागा नेमकी कुठे असेल हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही. वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात गुरुवारी(दि.22) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

करवीर नगरी कोल्हापूर राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे. या जिल्ह्यामधून हजारो तरुण नोकरी, धंदा आणि व्यवसाय निमित्त आता मुंबईत स्थायिक झाले आहेत. कोल्हापूरमधून आलेले हे नागरिक बहुतांश करून मुंबईत लालबाग, परळ, डिलाईल रोड, शिवडी या ठिकाणी वास्तवाला आहेत. त्यामुळेच परळ-लालबाग, डिलाईल रोडला मिनी कोल्हापूर असेही संबोधले जाते.

मुंबई शहरातील जागेच्या किमतीं अफाट असल्याने, या नागरिकांना भेटायला येणाऱ्या, वैद्यकीय उपचारासाठी आणि नोकरी धंदा करण्याच्या शोधासाठी कोल्हापूरहून मुंबईला आलेल्या नागरिकांना येथे भाड्याने घर घेणेही अशक्‍य होते. त्यामुळे हक्काचे कोल्हापूर भवन मुंबईत निर्माण व्हावे यासाठीची कोल्हापूरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे स्वत: वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीस सामोरे जाणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. वरळी मतदार संघात सुमारे 35 हजाराहून अधिक मतदार हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

ही मते आपल्याकडे झुकावीत, यासाठी त्यांची ही घोषणा असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. दरम्यान म्हाडा कार्यालयात गिरणी कामगार, बीडीडी चाळ आणि मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात आले होते.

त्यावेळी त्यांनी कोल्हापूर भवनासाठी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा पुढे रेटल्याने, येथे राहणाऱ्या कोल्हापूर वासियांच्या मनात आपोआपच आदित्य ठाकरेंविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे.

12 वर्षापुर्वीची मागणी...
तत्कालीन कॉंग्रेस आघाडीच्या काळात अपांरपरिक ऊर्जा मंत्री असलेल्या विनय कोरे यांनी 2007-08 ला दादर शिवाजी पार्क येथील कोल्हापूर महोत्सवात ही मागणी केली होती. त्यानंतर सातत्याने ही मागणी विधानभवनात लावून धरली. मात्र 2014 च्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर मागणी रेंगाळली.

मात्र यानंतर मुंबईस्थित कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान व वरळी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आता पुन्हा आदित्य ठाकरे यांनी या जागेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितल्याने, कोल्हापूर वासियांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com