मुलांनी मुलींशी कसे वागावे हे देखील सांगितले पाहिजे : आदित्य ठाकरे - Aditya Thakare meets Ashish shelar to discuss student's problems | Politics Marathi News - Sarkarnama

मुलांनी मुलींशी कसे वागावे हे देखील सांगितले पाहिजे : आदित्य ठाकरे

राजू सोनवणे
बुधवार, 26 जून 2019

आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाबाबत सविस्तर चर्चा केली.

मुंबई : मुलांनी मुलींशी कसे वागावे हे देखील सांगितले पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयात प्रत्येक सेमिस्टरमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षणाबाबत एकतरी सेशन झाले पाहिजे, अशी सूचना युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "इंटिग्रेटेड क्‍लासेस बेकायदा आहेत असे सरकारने गेल्या वर्षीही सांगितले होते पण त्याबद्दल कोणतीही कारवाई झालेली नाही. अशा चुकीच्या गोष्टींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली आहे.''

अकरावीच्या मुलांना दरवर्षी प्रवेशाकरिता गिनिपीग का करता? आता तरी ते थांबविलं जाईल अशी अपेक्षा श्री. शेलार यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

"दहावीच्या पुर्नमुल्यांकनात पारदर्शकता असायला हवी. अकरावी आणि तेरावीच्या ऑनलाइन ऍडमिशनमध्ये येणाऱ्या अडचणी थांबाव्यात. एसएससीचा दर्जा वाढवून आयसीसी आणि सीबीएससीच्या पातळीवर कसा आणता येईल याबाबतही चर्चा झाली. अभ्यासक्रमामध्ये आणि शालेय शिक्षण पद्धतीमध्ये त्यासाठी आवश्‍यक त्या सुधारणा करण्याबाबत एकमत झाले," असेही श्री. ठाकरे म्हणाले.

श्री. ठाकरे पुढे म्हणाले, " श्री. आशिष शेलार सकारात्मक आहेत. यांपैकी अनेक गोष्टींची पूर्तता याच अधिवेशनात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बैठक चांगली झाली. श्री. शेलार यांच्याशी नित्याचे संबंध असल्याने बैठक चांगली पार पडली. अधिकारी आणि सर्वांनीच आमचे म्हणणे ऐकून घेतले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख