Aditya Thackeray Wants Environment Ministry | Sarkarnama

आदित्य ठाकरेंना हवे पर्यावरण खाते?

दीपा कदम
गुरुवार, 2 जानेवारी 2020

आदित्य यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसताना ते कॅबिनेट पद कसे सांभाळणार यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळेच आदित्य यांना पर्यावरण हे काहीसे दुर्लक्षित मात्र ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्‍न अधिक जटील झालेले असल्याने महत्त्वाचे बनलेले खाते दिले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मुंबई : मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटपाचं घोंगड भिजत पडले असताना शिवसेनेचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र पर्यावरण खात्याबाबत उत्सुकता दाखविली आहे. आदित्य ठाकरे या मंत्रीमंडळात कोणती जबाबदारी पार पाडणार याविषयी उत्सुकता आहे. पर्यावरण आणि क्रीडा या खात्यांबाबत आदित्य ठाकरे अधिक कल्पक काम करण्याची शक्‍यता असल्याने ही खाती आदित्य ठाकरेंकडे जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला पहिला 'ठाकरे' म्हणून आदित्य यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे. पहिल्यांदाच आमदार झाल्यावर मुख्यमंत्री पदावर वडिल उध्दव ठाकरे असतानाही कॅबिनेट मंत्रीपदी आदित्य यांची वर्णी लागल्याने शिवसेनेतील जुन्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. आदित्य यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसताना ते कॅबिनेट पद कसे सांभाळणार यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळेच आदित्य यांना पर्यावरण हे काहीसे दुर्लक्षित मात्र ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्‍न अधिक जटील झालेले असल्याने महत्त्वाचे बनलेले खाते दिले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

विशेषत: प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनीच पुढाकार घेतला होता. रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झालेली वृक्षतोड रोखण्यासाठी आदित्य यांनी पुढाकार घेतला होता. पर्यावरण खात्याशी संबंधित विषयांमध्ये तरूणांना सोबत घेवून अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असल्याने आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खातं मिळण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, कृषी खात्यावर कॉंग्रेसनेही दावा केला असला तरी शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि दादा भुसे या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या सरकारमध्ये सुभाष देसाईंनी उद्योग खाते सांभाळले असले तरी जबाबदारी चोख पाळण्यामध्ये उध्दव ठाकरे यांचे विश्‍वासू असल्याने देसाई यांच्याही नावाचा कृषी खात्यासाठी विचार केला जात असल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख