Aditya Thackeray hurried to minister? | Sarkarnama

आदित्य ठाकरेंना मंत्री करण्यात घाई झाली ? 

प्रकाश पाटील 
सोमवार, 30 डिसेंबर 2019

शिवसेनेत अनेक आमदार असे आहेत की ज्यांनी पक्षासाठी दिवसाची रात्र केली आहे. अशा एखाद्या अभ्यासू आमदाराला आदित्य यांच्याऐवजी मंत्री केले असते तर चालले नसते का ? आदित्य हे मंत्री नसते झाले तरी त्यांचे ठाकरे म्हणून महत्त्व काही कमी झाले नसते. त्यांचा आमदार आणि मंत्र्यांवर अंकुश हा राहिला असता की नाही ?

वडील मुख्यमंत्री आणि मुलगाही मंत्री हे चित्र यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात कधी दिसले नव्हते. ते प्रथमच दिसत आहे. वास्तविक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनल्याने आदित्य हे मंत्री होणार नाहीत. ते पक्षाकडे अधिक लक्ष देतील असे म्हटले जात होते मात्र ते काही खरे ठरले नाही. 

पंधरावीस वर्षानंतर सत्ता आणि मुख्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे.आदित्य हे ठाकरे घराण्याचे पहिले आमदार बनले. त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवल्याने ते आमदार म्हणून सक्रिय राहतील आणि भरपूर शिकतील. ते तयार होत आहेत. असे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत नेहमीच सांगत आले. शिवसेनेच्या वाटेला जी काही मंत्रिपदे आली आहेत ती मुळातच कमी आहेत. जे शिवसेनेचे ते दोन्ही कॉंग्रेसचे झाले आहे. त्यामुळे सर्वांचे समाधान करणे कदापी शक्‍य नाही. 

आज विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड नाराजी दिसत आहे. कॉंग्रेसचे पुण्यातील आमदार संग्राम थोपटे नाराज असल्याचे वृत्त येत नाही तोवर शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले.

ज्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जिवाचे रान केले त्या संजय राऊत यांच्या बंधूंना सुनील राऊत यांना मंत्री केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यांनाही डावलले. मंत्री न केल्याने ते आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचेही सांगितले जात आहे. यापुढे विधानसभेत पाय ठेवणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केल्याचेही समजते. 

यासर्व घडामोडींवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की आम्ही नाराज नाही. का आणि कशासाठी नाराज व्हायचे ? पक्षाने काही दिले नाही म्हणून आम्ही नाराज होणार नाही. राऊत यांची पक्षावरील निष्ठा समजण्यासाठी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्यातील तीन पिढ्यांबरोबर राऊत काम करीत आहेत. शिवसेना हा संजय राऊत यांचा श्‍वास आहे. त्यामुळे ते भावाची समजूत काढतीलही. एक गोष्ट खरी की कोणालाही सत्तेचा मोह आवरत नाही. 

वडील मुख्यमंत्री असताना मुलालाही मंत्री करण्याची घाई का केली ? हे कळले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेतही घराणेशाही आहे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही हे ठाकरे घराण्याकडेही आज पाहिले तर तसे लक्षात येते. 

आदित्यच का ? 
पक्षात अनेक आमदार असे आहेत की ज्यांनी पक्षासाठी दिवसाची रात्र केली आहे. अशा एखाद्या अभ्यासू आमदाराला आदित्य यांच्याऐवजी मंत्री केले असते तर चालले नसते का ? आदित्य हे मंत्री नसते झाले तरी त्यांचे ठाकरे म्हणून महत्त्व काही कमी झाले नसते. त्यांचा आमदार आणि मंत्र्यांवर अंकुश हा राहिला असता. 

प्रथमच आमदार झाल्याने पुढील पाच वर्षे त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आला असता. पुढच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव यांच्याऐवजी आदित्य मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आले असते. पक्षात सुनील राऊत नाराज झाले आहेत. तशी नाराजी अनेक आमदारांमध्येही आहे.

मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केले जात आहे असा संदेशही राज्यात गेला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या राजकारणावर टीका करणारी शिवसेना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे निघाली असे म्हणण्यास काही हरकत नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख