aditya and state government | Sarkarnama

मुंबईला दर्जेदार शहर बनवणार ! : आदित्य ठाकरे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

.....

मुंबई : मुंबईकरांना बऱ्याचदा खड्डे, खराब रस्ते, कचरा तसेच पाणी तुंबण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असून त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रशासनाला दिले. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पहिली आढावा बैठक गुरुवारी घेतली. पायाभूत सुविधा निर्माण करून मुंबईला दर्जेदार शहर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी मुंबईला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली. यासोबत त्यांनी उपनगरातील रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचीदेखील माहिती घेतली. या वेळी यांच्यासोबत परिवहनमंत्री अनिल परब, पूर्व-पश्‍चिम उपनगरातील पालिका विभागाचे उपआयुक्त, सहआयुक्त, म्हाडा, एमएमआरडीए, मेट्रो, बेस्ट व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. 
चांगले रस्ते, पदपथ, कचरामुक्त मुंबई, रेल्वे परिसराचा विकास आदी मुंबईशी निगडीत विषयांवर चर्चा करण्यात आली. उपनगरातील लोकसंख्या अधिक आहे, त्यामुळे येथे काम करताना कोणी कनिष्ठ किंवा वरिष्ठ अशी भूमिका न घेता एक टीम म्हणून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पर्यावरणाला नुकसान न होता चांगले काम करण्यासाठी पर्यावरण आणि गृहनिर्माण संस्था यासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख