Who will be new District Collector of Pune | Sarkarnama

पुणे जिल्हाधिकारीपदासाठी अनेक नावांवर खल; डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती होण्याची शक्यता

उमेश घोंगडे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण? याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते. पुण्यात इतर पदांवर सध्या झालेल्या आधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पाहता डॉ. देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे

पुणे : पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी अनेक नावांची चर्चा असली तरी हाफकिन इन्स्टिट्यऊटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण? याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. 

या काळात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुंबई 'म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अस्तिककुमार पांडे, एस. पी. सिंग 'पीएमआरडी'चे आयुक्त सुहास दिवसे व पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल या नावांची चर्चा झाली आहे.

डॉ. देशमुख यांची नियुक्ती झाली तर पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविणारे ते चौथे देशमुख ठरणार आहेत. यापूर्वी शिवाजीराव देशमुख, प्रभाकर देशमुख व विकास देशमुख यांनी पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी होण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच चढाओढ असते. मात्र, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मनात कोणता अधिकारी आहे. यावर बरेच काही अवलंबून आहे. 

लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यापूर्वी अकोला येथे चांगले काम केले आहे. श्रीकांत हे तरुण, तडफदार आणि कार्यक्षम अधिकारी आहेत. याशिवाय पुण्यात यापुर्वी विविध पदांवर काम केलेले आणि पुणे जिल्ह्याची माहिती असणारे डॉ. योगेश म्हसे यांचेही नाव चर्चेत आहे. डॉ. म्हसे यांची नुकतीच मुंबई म्हाडाच्यामुख्य कार्यकारी आधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

'पीएमआरडीए' चे आयुक्त म्हणून नुकतेच रुजू झालेले सुहास दिवसे यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. दिवसे यांनीही पुण्यात निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त आयुक्त, कृषी आयुक्त अशा विविध पदांवर काम केले असून, त्यांनाही पुणे जिल्ह्याची चांगली ओळख आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते. पुण्यात इतर पदांवर सध्या झालेल्या आधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पाहता डॉ. देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. आधिकाऱ्यांमधील मराठी-अमराठी तसेच थेट आयएएस आणि स्टेट केडरमधून आयएएसपदी बढती मिळालेले आधिकारी अशी स्पर्धा असते. यातून योग्य समतोल साधत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून त्यात पालकमंत्री अजित पवार यांना काय वाटते हेच महत्वाचे ठरणार आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख