श्रीगणेशाची मुर्ती घेऊन खुद्द एसपी दारात; पोलिस कुटूंबिय आनंदले

कोरोनावर विजय मिळविणाऱ्या पोलिसांच्या घरी जाऊन त्यांना श्रीगणेशाची मुर्ती देऊन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सन्मान केला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाची स्थापनाही केली.
Beed SP Reached Police Constables home with Ganesh Idols
Beed SP Reached Police Constables home with Ganesh Idols

बीड : एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस अधीक्षकांकडूनन चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप किंवा रिवार्ड दिले जात असले तरी सार्वजनिक किंवा कार्यालयीन कार्यक्रमात. मात्र, शनिवारी परळीच्या पोलिसांना व कुटुंबियांना सुखद धक्का बसला. चक्क पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाची मुर्ती घेऊन पोचले. गणेश मुर्ती देऊन कर्मचाऱ्यांचा त्यांनी सत्कारही केला आणि त्यांच्या घरातील गणेशाची स्थापनाही खुद्द हर्ष पोद्दार यांनीच केली. त्यामुळे कुटुंबिय देखील सुखावून गेले.

चेक नाक्यावरील ड्युटीदरम्यान कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने परळीतील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना कोरेानाची बाधा झाली. पाचही जणांनी कोरोनावर विजय मिळविला. यातील दोघांचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी देखील संपला आहे. दरम्यान, शनिवारी गणेशाचे आगमन झाले. यंदा कोरेाना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. साधेपणानेच घरात यंदा गणेशाची स्थापना करण्यात येत आहे. 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मधल्या काळात एका धक्क्यात गेलेले पोलिस कर्मचारी व कुटूंबिय आता सावरुन गणेशाची स्थापना करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी बाजारातून मुर्ती खरेदीचीही तयारी सुरु असतानाच चक्क पोलिस अधीक्षक या कर्मचाऱ्यांच्या दारात श्रीगणेशाची मुर्ती घेऊन हजर झाले. 'जिल्ह्यातील जनतेला कोरोना विषाणूपासून वाचविण्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले. त्यातून तुम्हाला बाधा झाली मात्र हिंमतीने तुम्ही कोरोनावर विजय मिळविला' असे म्हणत त्यांनी गणेशाची मुर्ती पोलिस कर्मचाऱ्यांना देऊन सन्मान केला. 

विशेष म्हणजे पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरातील श्रीगणेशाची स्थापनाही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीच केली. या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही मोठ्या पारितोषिक, रिवार्डपेक्षा हा मोठा आनंदाचा आणि हर्षोल्हासाचा हा क्षण ठरला. खुद्द एसपी घरी आणि तेच घरच्या सोहळ्यात सहभागी झाल्याने पोलिस कर्मचारी आणि कुटूंबिय देखील भारावून गेले. पोलिस अधीक्षकांच्या या कृतीने कुटुंब प्रमुख म्हणून अडचणीच्या काळात कायम धीर देण्यासाठी पाठीशी असल्याचा संदेश पोलिस दलात गेला. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या काळात अव्वल काम करणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना भेट देऊन एसपी पोद्दार यांनी कुटूंबियांची ख्याली - खुशालीही विचारली. 

या काळात पोलिस कर्मचारी सदैव ड्युटीवर असल्याने त्यांचे आणि कुटूंबियांचे मानसिक आरोग्य आबाधीत रहावे यासाठी खास कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. या सेलच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून या कर्मचाऱ्यांना मानसिक आधार दिला जात आहे. आता पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आत्मनिर्भर हा विलगीकरण कक्षही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून उभारला आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस, राहूल दुबाले सोबत होते.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com