SP देशमुखांनी निभावली पालकत्वाची जबाबदारी : विम्याची 50 लाखांची रक्कम आठ दिवसांत - SP Dr. Deshmukh fulfills guardianship responsibility and gives insurance amount in eight days | Politics Marathi News - Sarkarnama

SP देशमुखांनी निभावली पालकत्वाची जबाबदारी : विम्याची 50 लाखांची रक्कम आठ दिवसांत

निवास चौगले
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कोरोनाबाधित पोलिसांशी त्यांनी स्वतः संपर्क साधून मानसिक आधारही दिला. अशा कर्मचाऱ्यांच्या घरी अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या कुटुंबालाही आधार देण्याचे काम केले.

कोल्हापूर : खाकी वर्दीच्या आतही एक हळवा माणूस दडलेला असतो मग तो एखादा पोलीस कर्मचारी असो किंवा पोलीस अधीक्षक. पोलीस अधीक्षक तर पोलीस कुटुंबाचे प्रमुखच. आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांप्रती आदरभाव आणि अडचणीच्या काळात त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना बळ देण्याचे काम महत्त्वाचे असते. कोल्हापुरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे त्यापैकीच एक. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या वारसांना अवघ्या आठ दिवसांत 50 लाखांचा वीम्याचा धनादेश त्याच्या घरी जाऊन देत डॉ. देशमुख यांनी खऱ्या अर्थाने पोलीस कुटुंबातील पालकत्त्वाची भुमिका निभावली आहे.

कोरोनामुळे पुकारलेल्या संचारबंदीत पोलीस दलावर प्रचंड ताण होता. स्वतः डॉ. देशमुख हे कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रात्रदिवस रस्त्यावर उभे राहून काम करणाऱ्या पोलिसांना बळ देत होते. या काळात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला पण त्यांच्यासाठी हातकणंगले येथील कोविड केंद्रात स्वतंत्र व्यवस्था करण्यापासून ते त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी ते झटत राहीले. एवढेच नव्हे तर अनेक कोरोनाबाधित पोलिसांशी त्यांनी स्वतः संपर्क साधून मानसिक आधारही दिला. अशा कर्मचाऱ्यांच्या घरी अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या कुटुंबालाही आधार देण्याचे काम केले.

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या पोलिसांसाठी शासनाने 50 लाखांचे वीमा कवच जाहीर केले आहे. योजना चांगली असली तरी त्यातील अडचणी खूप आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर पोलीस दलातील संजीत जगताप या अवघ्या 48 वर्षाच्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला. या कर्मचाऱ्याला 50 लाख रूपयांचे विमा कवच मिळवून देण्यासाठी डॉ. देशमुख कामाला लागले आणि अवघ्या आठ-दहा दिवसांत या रक्कमेचा धनादेश स्वतः कै. जगताप यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीकडे त्यांनी सुपुर्द केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर कै. संजीतच्या मुलगा आणि मुलगीच्या शैक्षणिक आणि इतर कोणत्याही अडचणी आल्या तर जरूर सांगा असा मायेचा आधारही त्यांनी दिला.

डॉ. देशमुख यांच्या या कृत्तीने जगताप कुटुंबीयही भावूक झाले. पोलीस दलाचा प्रमुखच पालक या नात्याने घरी येऊन आधार देतो म्हटल्यावर या कुटुंबाला हुंदका आवरला नाही. लाखभर रूपयांच्या विम्यापेक्षा घरातील कर्त्या पुरूषाचा असा दुर्दैवी मृत्यु हा कधीही वाईटच असतो पण अशा कुटुंबालाही आधार देण्याचे काम करत डॉ. देशमुख यांनी खऱ्या अर्थाने पालकत्त्वाची जबाबदारी निभावली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख