पोलिसांचाच जीव टांगणीला : "कोरोना पॉझिटीव्ह' आरोपीला ठेवायचे कुठे? त्याच्यासोबतच मुक्काम - life of police in danger as have keep watch on suspect in vehicle | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांचाच जीव टांगणीला : "कोरोना पॉझिटीव्ह' आरोपीला ठेवायचे कुठे? त्याच्यासोबतच मुक्काम

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

तो कोरोना पॉझिटीव्ह आला आणि पुढे पोलिसांच्या जीवाशी खेळ सुरू झाला....

कोल्हापूर : एका गुन्ह्यात त्या संशयित आरोपीला अटक झाली. छातीत वेदना होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले. तेथे पुण्यातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. पुढे 108 रुग्णवाहिकेतून त्याला पुण्यात दाखल केले. तेथील सर्व परिस्थिती पाहता त्या खुद्द संशयित आरोपीने तेथे उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला पुन्हा कोल्हापुरात आणले. सबजेल मध्ये नेण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली. तेंव्हा तो कोरोना पॉझिटीव्ह आला आणि पुढे पोलिसांच्या जीवाशी खेळ सुरू झाला.

कोल्हापुरातून पुण्याच्या रुग्णालयात गेल्यानंतर तेथील अवस्था पाहून संशयित आरोपी आणि पोलिस सुद्धा चक्रावून गेले. आरोपीनेही प्राथमिक उपचार वगळता पुढील उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला कोल्हापुरात आणायचे होते. अखेर वरिष्ठांशी संपर्क साधल्यावर कोल्हापुरातून स्वतंत्र पोलिस गाडी पाठवून रात्रीत कोल्हापुरात आणण्यात आले. दरम्यानच्या काळात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे सीपीआर मध्ये रात्रीत त्याची वैद्यकीय तपासणी करून कारागृहात दाखल करायचे होते. सीपीआर मध्ये पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केल्यावर "ऍन्टीजेन टेस्ट' पॉझिटीव्ह आली. तरीही त्याला तेथे थांबून घेतले नाही. अखेर जीवमुठीत घेवूनच पॉझिटीव्ह रुग्ण सोबत असल्याचे माहिती असून ही पोलिसांनी त्याला योग्य उपचारासाठी दाखल करण्यासाठी धडपड सुरू केली.

न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणून पोलिसांनी त्याला थेट सबजेल मध्ये नेले. तेथेही त्याला घेण्यास नकार दिला. तेथून त्याला पोलिसांच्याच गाडीतूनच आयटीआय येथील कैद्यांच्या अलगीकरण कक्षात नेले. तेथेही त्याला घेतले नाही. त्यानंतर पोलिसांनी आयसोलेशन हॉस्पीटल गाठले. तेथेही नकार घंटा वाजली. तेथून पोलिसांनी शिवाजी विद्यापीठाचे "डीओटी' अलगीकरण केंद्र गाठले. मात्र तेथे एकच व्यक्ती होती. तीही पॉझिटीव्ह. त्यामुळे तेथेही संशयित आरोपीला दाखल करता आले नाही. अखेर पोलिसांनी आपल्याच पोलिस गाडीतून त्याला टाऊन हॉल बागेजवळ आणले. रात्री पासून सुरू असलेला हा प्रवास पहाटेपर्यंत सुरू होता. त्यामुळे संशयित आरोपीला दाखल करण्याचा अटापीटा पोलिसांनी थांबविला. पोलिसांनी पॉझिटीव्ह असलेल्या संशयित आरोपी सोबतच पोलिस जीपमध्येच एकानंतर एका पोलिसाने डुलका काढला. अखेर सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाली आणि रात्रभरातील पोलिसांचीही धावपळ सकाळी दहाच्या सुमारास संपली. आता तेही पॉझिटीव्ह होतील की काय याची भिती होती. मात्र त्यांची चाचणी निगेटीव्ह आली. मात्र त्या पोलिसांच्या जीवाशी खेळ झाला. "करवीर' काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात आता पोलिसही असुरक्षित असल्याची भावना पोलिसांची झाली आहे.

संशयित आरोपीला कोल्हापुरातून पुण्याला 108 रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. यावेळीही 50 वर्षाहून अधिक वय असलेला पोलिस कर्मचारी त्यांच्या सोबत होता. ही माहिती "त्या' पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी थेट वरिष्ठांचे घर गाठले. भेट झाली नाही म्हणून घरी परतले. थोड्याच वेळात वरिष्ठांचा त्यांना फोन आला. तेंव्हा त्यांनी ही माहिती सांगितली. वरिष्ठांना तातडीने त्यांना कोल्हापुरात बोलविले आणि दुसरा कर्मचारी पाठविला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख