आढळराव हे 40 ते 75 हजाराच्या लिडने जिंकणार! : प्रशांत किशोरनी लिहून दिलयं

आढळराव हे 40 ते 75 हजाराच्या लिडने जिंकणार! : प्रशांत किशोरनी लिहून दिलयं

शिक्रापूर : शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांचा यावेळी चौकार की ते होणार ते क्लिन बोल्ड होणार, यावर शिरूर मतदारसंघात चर्चा झडत आहेत. मात्र शिवसैनिकांसाठी मतमोजणीआधी एख खूषखबर आली आहे.

निवडणूक रणनीतीतील तज्ज्ञ आणि शिवसेना-भाजप युतीसाठी प्रयत्न करणारे प्रशांत किशोर यांनी शिरुरची जागा शिवसेनाच जिंकणार असा अहवाल दिला असून खासदार शिवाजीराव आढळराव चौकार मारणार असल्याचा स्पष्ट अहवाल त्यांनी दिला आहे.  

शिरुर लोकसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या अभिनेता अमोल कोल्हेंनी चांगलेच आव्हान निर्माण केले. छत्रपती संभाजी महाराजांची मालिकेतील प्रतिमा आणि उमेदवार म्हणून अगदी कोरी पाटी अशा दोन बलस्थानांमुळे या निवडणुकीत पक्षसंघटना म्हणून राष्ट्रवादी चांगलीच सक्रीय झाली होती. शिवाय सलग तीन टर्मची आढळराव यांच्या विरोधातील नाराजी, युतीचा निर्णय होण्यात झालेली दिरंगाई आणि भाजपाचे नेते-पदाधिका-यांची नाराजी दूर करण्यासाठी मिळालेला कमी वेळ, अशा बाबी शिवसेनेच्या विरोधात गेल्या होत्या.

या सगळ्याच पार्श्वभूमीवर आढळरावांच्या विजयाबद्दल शिवसैनिक व भाजपाच्या सर्व अधिकारी-पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत धाकधूक आहे. या उलट कोल्हेंच्या गटात मात्र उत्साह असून ज्या नारायणगावचे कोल्हे आहेत ते नारायणगावकर हल्ली त्यांचा उल्लेख थेट खासदार म्हणूनच करु लागल्याने संपूर्ण युती चिंतेत आहे.

प्रशांत किशोर यांच्या टिमने आज सकाळीच शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निकालाचा अहवाल दिला असून यात खासदार शिवाजीराव आढळराव हे किमान ४० ते कमाल ७५ हजारांनी विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. 

निकालाचा अंदाज घेण्यासाठी प्रशांत किशोर यांनी आपले १०० प्रतिनिधी मतदानापूर्वी १५ दिवसांपासून संपूर्ण मतदार संघात सक्रीय केले होते. यात शिवसेना-भाजपाचे कोण पदाधिकारी सक्रीय आहेत. कोण किती मतदान करवून घेतोय ते कुणाच्या मनात काय आहे. याची सगळी इत्थंभूत माहिती त्यांनी संकलित केली असून संपूर्ण मतदार संघातील तब्बल एक लाख सामान्य मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीनुसार हा अहवाल तयार केला आहे.

या शिवाय शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात मोडत असलेल्या या मतदारसंघातील मतदान कसे झाले तेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले असून ग्रामिण भागात राष्ट्रवादी तर; शहरी भागात शिवसेना असा स्पष्ट कल मतदारांमध्ये राहिल्याचेही या टिमने आपल्या अहवालात कळविल्याची माहिती टिम समन्वयकांनी दिली.      

यावेळीची लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा असा सगळ्यांच्याच आगामी विधानसभा निवडणूकीतील उमेदवा-याही या निवडणूकीचे निकाल निश्चित करणार आहे. पर्यायाने भाजपा-सेनेच्या सर्व इच्छुक पदाधिका-यांचा कार्यअहवाल या टिमने तयार केल्याची माहिती असून हा अहवाल `मातोश्री` आणि `वर्षा` अशा दोन्ही ठिकाणी अनुक्रमे उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निष्कर्ष व सूचनांसह पोहोचविला जाणार असल्याची माहिती प्रशांत किशोर यांच्या टिममधील एका वरिष्ठ पदाधिका-याने सांगितली. 

कोण आहेत प्रशांत किशोर?

ते आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. मोदी यांच्या 2014 च्या निवडणूक प्रचाराची काही जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी `चाय पे चर्चा` ही कल्पना मोदींसाठी राबविली होती. त्यानंतर ते राहुल गांधी यांच्याकडे गेले. तेथे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची काॅंग्रेसची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तेथे अपयशी झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी त्यांनी त्यानंतर बिहारमध्ये काम केले. तेथे संयुक्त जनता दलाला विजयी केले. ते आता त्या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्याही ब्रॅंडिगचे काम त्यांची कंपनी करत असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com